जगज्जेत्या गुकेशला आता कार्लसनचे आव्हान

बुद्धिबळ जगतातील सर्वात युवा जगज्जेता बनलेल्या हिंदुस्थानच्या डी. गुकेशला आता माजी जगज्जेता आणि अनुभवी खेळाडू असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचे आव्हान असेल. उभय तुल्यबळ खेळाडू आगामी वर्षी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत एकमेकांना भिडणार आहेत. ही स्पर्धा 26 मे ते 6 जून या कालावधीत होणार आहे. 18 वर्षीय गुकेशने या वर्षी टाटा स्टील मास्टर्स, बुद्धिबळ ऑलिम्पियाड, कँडिडेट्स या स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्या आठवडय़ात सिंगापूरमध्ये गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करीत डी. गुकेशने जगज्जेतेपद पटकावले होते. आता बुद्धिबळ विश्वातील आणखी एका बलाढय़ खेळाडूविरुद्ध (मॅग्नस कार्लसन) दोन हात करण्यास मी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया गुकेशने दिली. गुकेशला गतवर्षी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.