…तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागले असते, वर्ल्डकप फायनलवरून संजय राऊत यांची फटकेबाजी

वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर पार पडला. या सामन्यात यजमान हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला. हा सामना पाहण्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज, राजकीय नेते, सेलिब्रिटी उपस्थित असले तरी हिंदुस्थानला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांना फायनलसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी क्रिकेटचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मी आज कपिल देव यांचे निवेदन ऐकले. ज्याने या देशाला विश्वचषक मिळवून दिला, भाजप जगज्जेता आहे, होऊ शकतो ही भावना निर्माण केली त्या विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला फायनलसाठी आमंत्रित केले नव्हते. कपिल देव यांचे आगमण झाले असते तर इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागले असते. याला म्हणतात राजकारण. त्यामुळे नरेंद्र मोदी मैदानावर भारताचा पराभव झाला असला, याचे दु:खथ असले तरी पडद्यामागे ज्याप्रकारचे राजकारण क्रिकेटमध्ये सुरू आहे आणि काल झाले त्याच्यावर भविष्यात नक्कीच चर्चा होईल.

मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. दिल्लीलाही क्रिकेटचा माहोल असतो. फिरोजशहा कोटला मैदानात अनेक सामने होतात. विशेषत: आतापर्यंतची परंपरा अशी होती की अंतिम सामने मुंबईतील वानखेडे मैदानावर होत होते. परंतु मुंबईतील सर्वच खेचून न्यायचे, कार्पोरेट कार्यालये न्यायची पैसा न्यायचा आणि क्रिकेटही न्यायचे या ओढाताढात जरा गडबड झाली, असा टोला राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, या देशात खिलाडुवृत्ती आहे. खेळात हार, जीत होत असते. आपला संघ सलग 10 सामने जिंकला, पण अंतिम सामन्यात पराभूत झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा पराभव झाला. असे मोठे सामने दिल्लीतील फिरोजशहा कोटला किंवा मुंबईच्या वानखेडे मैदानात होतात. पण क्रिकेटमध्ये एका राज्याची लॉबी घुसली आहे. तिने आधी सरदार वल्लभभाई पटेल मैदानाचे नाव बदलून नरेंद्र मोदी केले आणि या मैदानावर अंतिम सामना घेऊन सगळे श्रेय भाजप आपल्याकडे घेण्याच्या विचारात होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

जगाला असे दाखवण्याचा प्रयत्न झाला की हा सामना भारतीय संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया नसून, भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया आहे. जिंकला तर भाजपमुळे. पण आता हरलात ना. भारतीय संघ उत्तम खेळला, हरलो असतो तरी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांच्यात जिद्द होती. पण भाजपच्या दु:खात मी सहभागी आहे, असे टोला राऊत यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, मी व्यक्तीगत टिकाटिप्पणी करणार नाही. पण भाजप अशा थाटात होता की वर्ल्डकप आम्हीच जिंकणार आहोत. वर्ल्डकप जिंकला असता तर या देशाला आनंद झाला असता. पण ज्या प्रकारचे राजकारण आणि भाजपकडून निकालानंतरची ज्याप्रकारची व्यवस्था करण्यात आली होती त्यावर पाणी फिरले. अर्थात विश्वचषक जिंकायला हवा होता. पण खेळात हार, जीत होते, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)