हिंदुस्थानच्या सुनील छेत्रीची दमदार किक! महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीच्या गोलांना टाकले मागे

हिंदुस्थानचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री याने सोमवारी फुटबॉलच्या रणांगणात दमदार किक मारली. सुनील छेत्रीने दोन जबरदस्त गोल करीत हिंदुस्थानला बांगलादेशविरुद्धच्या लढतीत 2-0 अशा फरकाने शानदार विजय मिळवून दिला. या दोन गोलसह सुनील छेत्रीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. त्याने अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीच्या 72 आंतरराष्ट्रीय गोलांना लीलया मागे टाकले. सुनील छेत्रीने हिंदुस्थानसाठी खेळताना आता 74 गोल केले आहेत हे विशेष.

हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यामधील लढत फिफा वर्ल्ड कप (2022) व एएफसी आशिया कप (2023) पात्रता फेरी अंतर्गत खेळवण्यात आली.

उत्तरार्धात दोन्ही गोल

हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यामधील लढतीत पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी झाली. त्यानंतर दुसऱया सत्रातही सुरुवातीला दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. सुनील छेत्रीने 79व्या मिनिटाला हिंदुस्थानसाठी पहिला गोल केला आणि आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 92व्या मिनिटाला सुनील छेत्रीने दुसरा गोल करीत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आता अफगाणिस्तानशी भिडणार

हिंदुस्थानने या विजयासह ई गटात तिसरे स्थान मिळवले आहे. हिंदुस्थानने सात सामन्यांमधून एका विजयासह सहा गुणांची कमाई केली आहे. हिंदुस्थानला तीन लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. तसेच तीन लढती ड्रॉ राहिल्या आहेत. बांगलादेशला सात सामन्यांमधून दोनच गुणांची कमाई करता आलेली आहे. हिंदुस्थानला आता 15 जून रोजी अफगाणिस्तानला भिडायचे आहे.

20 वर्षांनंतर विजय

हिंदुस्थानने फुटबॉल वर्ल्ड कप पात्रता फेरीत परदेशात तब्बल 20 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. याआधी 2001 साली 11 मे रोजी हिंदुस्थानने ब्रुनेईला पराभूत केले होते. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर हिंदुस्थानने बांगलादेशला ‘दोहा’मध्ये धूळ चारली आहे. हिंदुस्थानच्या वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करण्याच्या आशांना सुरुंग लागला आहे. पण आशिया कपमधील हिंदुस्थानचे आव्हान अद्याप कायम आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक

गोल करणारे फुटबॉलपटू

 • अली देई (इराण) – 109
 • ख्रिस्तीयानो रोनाल्डो (पोर्तुगाल) – 103
 • मोख्तार दहारी (मलेशिया) – 89
 • फेरेंक पुसकास (हंगेरी) – 84
 • गॉडफ्रे चितालू (झाम्बिया) – 79
 • हुसैन सईद (इराक) – 78
 • पेले (ब्राझील) – 77
 • कुनीशिगे कामामोटो (जपान) – 75
 • बशर अब्दुल्ला (कुवेत) – 75
 • सुनील छेत्री (हिंदुस्थान) – 74
 • अली माबखौत (यूएई) – 73
 • माजीद अब्दुल्ला (सौदी अरेबिया) – 72
 • लियोनेल मेस्सी (अर्जेंटिना) – 72
आपली प्रतिक्रिया द्या