कोणते संघ होणार वर्ल्ड कपसाठी पात्र? 13 संघांमध्ये होणार खडाजंगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला मागे टाकत आता क्रिकेट रुळावर येण्याचा प्रयत्न करीत आहे. आयसीसीकडून आता 2023 सालामध्ये हिंदुस्थानात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपसाठीच्या पात्रता फेरीची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेला सुपर लीग क्वॉलिफायर स्पर्धा म्हणून ओळखण्यात येणार आहे. इंग्लंड – आयर्लंड यांच्यामध्ये 30 जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेने या स्पर्धेचा श्रीगणेशा होईल. यामध्ये आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेले 12 देश व वर्ल्ड कप पात्रता फेरीमधून आलेला नेदरलॅण्ड अशा एकूण 13 संघांचा समावेश असणार आहे.

असा असेल सुपर लीगचा फॉरमॅट

सुपर लीगमध्ये सहभागी होणारा प्रत्येक संघ 2023 सालापर्यंत प्रत्येकी आठ मालिका खेळेल. यामधील चार मालिका मायदेशात तर चार मालिका परदेशात खेळवण्यात येतील. या मालिकेतील लढत जिंकणाऱ्या संघाला दहा गुण देण्यात येतील. लढत काही कारणास्तव रद्द झाल्यास पाच गुण देण्यात येतील. आठ मालिकांमधून मिळालेल्या गुणांच्या आधारावर संघांची रँकिंग ठरवली जाईल. यादरम्यान संघांचे समसमान गुण झाल्यास त्यावरही आयसीसीकडून नियम तयार करण्यात आले आहेत.

त्या पाच संघांना आणखी एक संधी

सुपर लीगमध्ये 13 संघांचा प्रवेश असणार आहे. मात्र यामधील आठ संघांनाच थेट वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करता येणार आहे. यामध्ये यजमान हिंदुस्थानचाही समावेश आहे. मात्र उर्वरित पाच संघांना वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. या संघांना आयसीसीच्या पाच असोसिएट मेंबरशी झुंजावे लागणार आहे. यामधून अव्वल दोन संघांना हिंदुस्थानात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये एण्ट्री देण्यात येणार आहे. याचा अर्थ फक्त दहा संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहेत. याच संघांमध्ये जेतेपदाचा फैसला होईल.

कोरोनामुळे टेस्ट चॅम्पियनशिपचे वेळापत्रक कोलमडले

कोरोनाचा फटका जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपलाही बसला आहे. बांगलादेश, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड या देशांकडून कसोटी मालिका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लवकरात लवकर या मालिकांच्या नव्या तारखांची घोषणा करण्यात येणार आहे. सध्या जून 2021 सालामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामध्ये आता तरी कोणता बदल करण्यात आलेला नाही, पण वेळापत्रक कोलमडल्यामुळे भविष्यात या तारखेत बदल झाल्यास आश्चर्य वाटायला नको.