World Cup 2019 ; इंग्लंडसाठीच्या व्हिसा अर्जदारांची संख्या वाढली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

यंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लडमध्ये होत आहे. 30 मे पासून क्रिकेट सामने सुरू होणार आहेत. आतापासूनच क्रिकेट वर्ल्ड कपचा फिवर दिसत आहे. क्रिकेट सामने पाहण्यासाठी ब्रिटनमध्ये जाणाऱ्या हिंदुस्थानींची संख्या लक्षणीय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुमारे 3,500 अर्ज ब्रिटनच्या व्हिसासाठी दररोज दाखल होत आहेत.

दरवर्षी एप्रिल ते जून या काळात व्हिसा अर्जांची संख्या वाढते. मात्र, यावर्षी क्रिकेट वर्ल्ड कपमुळे व्हिसाच्या अर्जाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दरवर्षी होणाऱ्या अर्जाच्या तुलनेत यंदा मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याचे ब्रिटनच्या उच्चायुक्ताच्या प्रवक्त्यांनी सांगितले. व्हिसाची मागणी 100 ते 150 टक्क्यांनी वाढल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी या काळात 1 हजार ते 2000 अर्ज दररोज दाखल होतात. यंदा दररोज 3500 अर्ज दाखल होत आहेत. क्रिकेट वर्ल्ड कपमुळेच ही संख्या वाढल्याचे ग्लोबल टुरिझम कॉउन्सिलचे अध्यक्ष इक्बाल मुल्ला यांनी सांगितले. वर्ल्ड कपच्या काळात सुमारे 80 हजार हिंदुस्थानी क्रिकेट सामने पाहण्यासाठी ब्रिटनला जाणार आहेत. दररोज येणाऱ्या अर्जांची संख्या पाहता त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानींचे क्रिकेटप्रेम लक्षात जास्तीत जास्त व्हिसा देण्याचा प्रयत्न असल्याचे उच्चायुक्ताकडून सांगण्यात आले. हिंदुस्थानव्यतिरिक्त इतर देशातूनही व्हिसासाठी अर्जांची संख्या वाढत असल्याचे उच्चायुक्ताकडून सांगण्यात आले.