World Food Day- हिंदुस्थानने ‘हे’ परदेशी पदार्थ केले आपलेसे!

3426

16 ऑक्टोबर म्हणजे जागतिक अन्न दिवस. जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतीत घडलेल्या लोकांना खऱ्या अर्थाने कुठला घटक एकत्र घेऊन येत असेल, तर ते अन्न होय. सर्व प्राण्यांची एक महत्त्वाची गरज असलेल्या अन्नाला हिंदुस्थानी संस्कृतीत पूर्णब्रह्म म्हटलं आहे. म्हणूनच आपला परका असा भाव न बाळगता हिंदुस्थानी संस्कृतीने अनेक खाद्यपदार्थ आपल्यात सामावून घेतले. ते काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या खाद्यसंस्कृतीत समाविष्ट झाले आणि हिंदुस्थानच्या संस्कृतीत एकरूप झाले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या नेहमीच्या आहारातले काही पदार्थ आहेत. ते मुळातच हिंदुस्थानी नाहीत. पण, तरीही आपण त्यांना आपलेसे केले. इतके की, ते मूळचे इथले नाहीत, अशी शंकासुद्धा येत नाही. खोटं वाटतं? मग जरा ही यादी बघाच…

1. चहा

tea

चहा हे तमाम हिंदुस्थानींचं अत्यंत आवडतं पेय आहे. पण, गंमत म्हणजे चहा हा मूळचा चीनचा आहे. चीन तो जगभरात निर्यात करत असे. पण, त्याची रेसिपी मात्र चीनने कोणालाच कळू दिली नव्हती. इंग्रजांनीही चीनचा चहा चाखला होता, पण त्याची रेसिपी काही त्यांना मिळत नव्हती. साधारण 19व्या शतकात हिंदुस्थानावर राज्य करताना आसाम इथल्या एका टेकडीवरच्या झाडाची पाने तिथले स्थानिक चवदार लागतात म्हणून उकळवून पित असल्याचं इंग्रजांना कळलं. त्यांना ती चव चीनच्या चहापेक्षा वेगळी तरीही उत्तम लागली. मग त्यांनी तो आसामचा चहा म्हणून विकायला सुरुवात केली. हळूहळू हिंदुस्थानात चहा हे नगदी पीक झालं आणि तमाम हिंदुस्थानी चहाप्रेमी!

2. कॉफी

coffee-cup

जी तऱ्हा चहाची तीच कॉफीची. कॉफी हा पदार्थ मूळचा इथियोपियामधला. तिथे याला कफा असं म्हटलं जातं. तिथून तो अरबस्थानात आला. चीनप्रमाणे अरबी लोकही कॉफीला अत्यंत जपत. अगदी कॉफीची बीदेखील ते देशातून बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेत असतं. परदेशात जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात असे. पण, एका सूफी संताने त्याही परिस्थितीत कॉफीच्या सात बिया हिंदुस्थानात आणल्या. संत असल्याने त्याची तपासणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याला बिया नेता आल्या. कर्नाटक किनाऱ्यावर पोहोचून त्याने तिथल्या मातीत त्या रुजवल्या आणि तिथलं हवामान कॉफीला पोषक असल्याचं निष्पन्न झालं. हळूहळू स्थानिकांनीही कॉफीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आणि दक्षिण हिंदुस्थानासह देशभरात कॉफी प्रसिद्ध झाली.

3. साखर

sugar

हा शब्द वाचून जरा धक्का बसेल तुम्हाला, पण हो हेही सत्य आहे. गंमत म्हणजे, हा पदार्थही चीनमधूनच हिंदुस्थानात आयात झाला आहे. हिंदुस्थानात उसाचं उत्पादन होत असलं तरी त्यातून साखर बनवण्याचं तंत्रज्ञान नव्हतं. त्यामुळे हिंदुस्थानात कोणत्याही गोड पदार्थात गूळ अथवा मध वापरला जाई. हिंदुस्थानला साखरेची प्रथम ओळख करून दिली ती चीननेच. चीनमधून आलेला, पांढरा शुभ्र गोड पदार्थ म्हणून उत्तर हिंदुस्थानात साखर ‘चिनी’ म्हणून प्रसिद्ध झाली.

4. मिरची

chilli-red

मिरची हा पदार्थ पोर्तुगिजांनी 16व्या शतकात हिंदुस्थानात आणला. त्यापूर्वी आपल्याकडे तिखट पदार्थ तयार करण्यासाठी काळी मिरी, आले, लसूण यांची पेस्ट वापरली जात असे. पोर्तुगिजांना इथलं हवामान मिरचीचं उत्पादन घेण्यासाठी उपयुक्त असल्याचं निदर्शनाला आलं. मग त्यांनी इथेच मिरचीचं पीक घेतलं आणि हळूहळू तिखटासाठी मिरची वापरली जाऊ लागली.

5. बटाटा

potato

बटाटा इसवी सन पूर्व 8000 ते 5000 दरम्यान पहिल्यांदा दक्षिण अमेरिकेतील ’पेरू’ देशामध्ये खाल्ला गेल्याचा इतिहास सापडतो. त्यानंतर सोळाव्या शतकात स्पेनकडून बटाट्याचा व्यापार सुरू झाला. त्यानंतर इंग्लंडमध्येही बटाटा लोकप्रिय झाला. हिंदुस्थानात बटाटा पोर्तुगिजांनी आणला. पोर्तुगीज भाषेतल्या मूळ बटाटा या शब्दावरून मराठीत बटाटा हा शब्द रूढ झाला.

6. समोसा

samosa-2

समोसा हा मध्य आशियातून हिंदुस्थानात आला आहे. समोसा हा शब्द फारसी शब्द ‘संबुश्क:’ पासून तयार झाला आहे. साधारण 11व्या शतकाच्या आसपास सामोश्यात खिमा किंवा सुका मेवा घालण्याची पद्धत होती. जेव्हा समोसा हिंदुस्थानात आला तेव्हा तो अजिबात त्रिकोणी नव्हता. तेव्हा तो गोलाकार असायचा. आकार स्वादाबरोबरच समोश्याला ‘समोसा’ हे नाव देखील आता आता मिळालेलं नाव आहे. संबुश्क, सम्बोसा असा अपभ्रंश होत होत आता हा पदार्थ समोसा म्हणून ओळखला जातो.

7. जिलेबी

jilebe

जिलेबी हा पदार्थ मूळचा पर्शियाचा आहे. आंबवलेल्या मैद्याच्या पिठापासून शुद्ध तुपात गोलाकार तळल्या जाणाऱ्या या जिलेब्या पर्शियनांसोबत हिंदुस्थानात आल्या. जिलेबीला पर्शियन भाषेत झलाबिया म्हटलं जात असे. त्यावरून हिंदीत जलेबी आणि मराठीत जिलेबी असा शब्द रूढ झाला.

8. गुलाबजाम

gulabjamun

गुलाबजाम हा शब्द गुलाबजामून या शब्दापासून निर्माण झालेला आहे. याचं मूळही पर्शियन आहे. गुलाब आणि जांभूळ याचा यात अप्रत्यक्ष संबंध आहे. कारण पर्शियात गोड पदार्थांमध्ये गुलाबपाणी टाकायची पद्धत होती. गुलाबजामच्या पाकातही ते वापरलं जायचं. शिवाय गुलाबजामचा आकारही वाटोळा नसून काहीसा लांबट गोल, एखाद्या जांभळासारखा असे. म्हणून त्याला गुलाबजामून असं म्हणायची पद्धत रूढ झाली. पर्शियाहून मोगलांमार्फत गुलाबजाम हिंदुस्थानात आला आणि इथल्या संस्कृतीत एकरूप झाला.

आपली प्रतिक्रिया द्या