World Osteoporosis Day- हाडं मजबूत बनवायची असतील तर हे पदार्थ जरूर खा!

दरवर्षी 20 ऑक्टोबर रोजी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस साजरा केला जातो. या दिवसाला साजरं करण्याचा हेतू लोकांना ऑस्टियोपोरोसिस या आजाराविषयी जागरूक करणे हा आहे. वाढत्या वयानुसार तसं बदलत्या जीवनशैलीनुसार हाडं कमकुवत होऊ लागतात. ज्यांमुळे ती तुटण्याचा धोका संभवू शकतो.

ऑस्टियोपोरोसिस हा एक हाडांचा आजार असून या आजारात हाडांच्या ठिसुळपणात वाढ होऊन ती तुटण्याची शक्यता वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे बोन मिनरल डेन्सिटीचा अभाव. वाढत्या वयाबरोबर हाडांमध्ये कॅल्शियम कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे हाडांचा मजबुतपणा कमी होऊन त्यामुळे हाडे तुटण्याची शक्यता वाढते. पण आहारात काही बदल करून तुम्ही ही झीज रोखू शकता.

पालेभाजी- आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. पालक, लाल माठ, मुळा, मेथी अशा प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे यांचा पुरवठा होतो. अनेक भाज्यांमध्ये असलेलं कॅल्शियम, मॅंगनीज आणि के जीवनसत्त्व हाडांना मजबूत करतं. तसंच तंतुमय असल्याने पोटही साफ राहतं.

पपनस- पपनस हे एक आंबटवर्गीय फळांमधील फळ आहे. यात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. क जीवनसत्त्वामुळे हाडं मजबूत राहतात. कॅल्शियमची झीज कमी होते. याखेरीज लिंबू, आवळा यांसारखी फळंही क जीवनसत्वाने युक्त असतात.

मासे- जे लोक मांसाहार करतात, त्यांच्यासाठी मासे हा उत्तम पर्याय आहे. अनेक माशांमध्ये प्रथिने असतात. शिवाय ड जीवनसत्त्वही असतं. ड जीवनसत्वामुळे कॅल्शियम हाडांमध्ये शोषलं जातं आणि हाडं मजबूत होतात.

अंडी- माशांखेरीज अंडी हाही प्रथिनांचा स्रोत आहे. तसंच अंड्यातील ड जीवनसत्त्वामुळे हाडं मजबूत होतात. हाडांची झीज कमी होते.

दूध- दूध हा हाडांसाठी अतिशय फायदेशीर असा कॅल्शियमचा पारंपरिक स्रोत आहे. दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, फॉस्फरस आणि पोटॅशियम तसंच मॅग्नेशियम असतं. तसंच दुधापासून बनलेले पनीरसारखे पदार्थही हाडांसाठी लाभदायक असतात. याशिवाय हाडांची नियमित तपासणी, व्यायाम यांमुळेही हाडांचं आरोग्य नीट राहतं.

आपली प्रतिक्रिया द्या