जगातील सगळ्यात कमी उंचीच्या माणसाचे अवघ्या 27 व्या वर्षी निधन

973

जगातील सर्वात कमी उंचीच्या माणसाचे निधन झाले आहे. खगेंद्र थापा मागार असं या माणसाचं नाव असून तो अवघ्या 27 वर्षांचा होता. खगेंद्र हा नेपाळच्या बागलुंग जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याची उंची अवघी 2 फूट 2.41 इंच एवढी होती. खगेंद्रच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला.

खगेंद्रची नोंद गिनीज बुकात झाली होती. गिनीज बुकाने त्याच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त करताना म्हटलंय की त्याच्या कमी उंचीमुळे त्याला जीवनात बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत होतं. मात्र त्याने त्याचा बाऊ न करता या अडचणींचा मुकाबला केला. खगेंद्रला जगातील सर्वात कमी उंचीचा माणूस म्हणून 2010 साली गौरवण्यात आलं होतं. त्याच्या 18व्या वाढदिवसालाच त्याची गिनीज बुकात नोंद करण्यात आली होती. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना त्याने म्हटले होते की “मी स्वत:ला छोटा म्हणून पाहात नाही, मी देखील मोठी व्यक्ती आहे. “

गिनीज बुकात सगळ्यात कमी उंचीच्या दोन प्रकारच्या व्यक्तींची नोंद आहे. पहिली म्हणजे चालू शकणारी व्यक्ती आणि दुसरी म्हणजे न चालू शकणारी व्यक्ती. खगेंद्र हा चालू शकणारा सगळ्यात कमी उंचीचा माणूस आहे. त्याच्याहीपेक्षा कमी उंचीचा माणूस हा फिलीपीनो बालाविंग हा होता मात्र तो चालू शकत नव्हता. खगेंद्रपेक्षाही कमी उंचीचा आणि चालू शकणारा माणूस म्हणून नेपाळच्याच चंद्रबहाद्दूर डांगीने गिनीज बुकात स्थान मिळवलं होतं. मात्र डांगीचा 2015 साली मृत्यू झाल्याने खगेंद्रची पुन्हा एकदा कमी उंचीचा माणूस म्हणून गिनीज बुकात नोंद झाली होती.

खगेंद्रला सगळ्यात पहिल्यांदा नेपाळमधल्याच एका स्थानिक विक्रेत्याने पाहिले होते. त्यावेळी लहान मुलांसोबत त्याचा फोटो काढण्यासाठी तिकीट घ्यावं लागत असे. 2010 साली त्याला गिनीज बुकात स्थान मिळालं, यानंतर खगेंद्र युरोप आणि अमेरिकेला जाऊन आला जिथे त्याला अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्धी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या