जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, हिंदुस्थान ऑस्ट्रेलियात रस्सीखेच

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना या वर्षी जून महिन्यात लॉर्डस् या क्रिकेटच्या पंढरीत रंगणार आहे. पण अंतिम फेरीत कोणते दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत हे अद्याप निश्चित झालेले नाही. ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान व न्यूझीलंड या तीन देशांमध्ये फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कमालीची चुरस लागली आहे. मार्च महिन्यापर्यंतच्या कसोटी मालिकांच्या निकालावर फायनलमधील अंतिम दोन संघ ठरणार आहेत. न्यूझीलंडला आता एकही कसोटी सामना खेळावयाचा नाही. त्यामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत होणाऱया कसोटी लढतींसाठी हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया या दोन देशांचा कस लागणार हे निश्चित.

टीम इंडियासाठी समीकरण

हिंदुस्थानी संघ मार्च महिन्यापर्यंत पाच कसोटी सामने खेळणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक आणि इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांचा समावेश आहे. हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया यांच्यामधील अखेरचा सामना ड्रॉ राहिल्यास हिंदुस्थानला इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. तसेच एक लढत ड्रॉ ठेवावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्यास टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या चारही लढतींमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अखेरचा कसोटी सामना जिंकल्यास त्यांना इंग्लंडविरुद्धच्या चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे. यानंतर टीम इंडिया गुणतालिकेत न्यूझीलंडच्यावर राहणार आहे.

कांगारूंसाठीही महत्त्वाचा टप्पा

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी एकमेकांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. हिंदुस्थानविरुद्धचा अखेरचा सामना आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे तीन सामने त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियाकडून पराभूत झाल्यास ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेला तीन कसोटीत हरवावेच लागणार आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप

  • ताजा गुणतालिका (अव्वल पाच)
  • ऑस्ट्रेलिया – 73.8 (332 पॉइंट)
  • हिंदुस्थान – 70.2 (400 पॉइंट)
  • न्यूझीलंड – 70.0 (420 पॉइंट)
  • इंग्लंड – 60.08 (292 पॉइंट)
  • दक्षिण आफ्रिका – 40.0 (144 पॉइंट)
आपली प्रतिक्रिया द्या