
>>प्राजक्ता मोरे
माणूस काम करतो ते पोटापाण्यासाठी. पूर्वी लोक चुलीवर जेवण शिजवत असत. त्यानंतर रॉकेलचे स्टोव्ह आले. काही काळ कोळशावरही लोक जेवण शिजवत. अशा जेवण शिजविण्याच्या विविध पद्धती काळानुरूप बदलत गेल्या. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही म्हण खूपच प्रचलित आहे. आता तर घरोघरी गॅसच्या शेगडय़ा आहेत. गॅसच्या सिलिंडरवर चालणारी ही शेगडी जगात प्रथम कुणी बनविली असेल बरं! बालमित्रांनो, ही जगातील पहिली गॅसची शेगडी 1802 मध्ये झेकस विन्झलर याने बनविली, पण ती शेगडी जनसामान्यांपर्यंत नेण्याचे श्रेय इंग्लंडच्या जेम्स शार्प याच्याकडे जाते. 1826 मध्ये त्याने ही गॅस शेगडी जगभर नेण्यासाठी प्रयत्न केले. स्मिथ अॅण्ड फिलिप्स या कंपनीने 1928 पासून या गॅसच्या शेगडीची विक्री करायला सुरुवात केली.
1851 च्या इंग्लंडच्या मोठय़ा प्रदर्शनात ही गॅसची शेगडी ठेवण्यात आली होती. ती पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते.लंडनमध्ये रिफॉर्म क्लबचा अॅलेक्सिस सॉयर नावाचा जेवण बनविणारा बावर्ची होता. त्याने आपल्या हॉटेलच्या किचनमध्ये 1841 मध्ये ही गॅसची शेगडी सोयीची आहे म्हणून वापरण्यास सुरुवात केली.त्यामुळे सिलिंडर कितीही महाग झाला तरी लोकांचा अतिशय सोयीची म्हणून गॅस शेगडी वापरण्यावरच भर असतो. काही ठिकाणी शेणावरही गॅस बनविण्यात येतो. त्याला गोबर गॅस म्हणतात. त्यावरही शेगडय़ा चालतात आणि जेवण शिजवता येते.


























































