
गेली शंभर वर्षे तीन पिढ्यांपासून 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱया वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांचे 500 चौरस फुटांच्या अलिशान टू बीएचके घरात राहण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 556 रहिवाशांना उद्या, गुरुवारी नव्या घराच्या चाव्या मिळणार आहेत. माटुंगा पश्चिम येथील यशवंत नाटय़मंदिरात सकाळी 11 वाजता चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे 1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 121 जुन्या चाळींतील 9 हजार 689 रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. म्हाडातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात 40 मजल्यांच्या 34 पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याअंतर्गत उभारलेल्या इमारत क्र. 1 मधील डी व ई विंगमधील 556 रहिवाशांना उद्या, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप केले जाणार आहे.
ऐतिहासिक वारशाचे जतन
वरळी प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींची ‘म्हाडा’तर्फे बारा वर्षे देखभाल केली जाणार असून मुंबईच्या राजकीय व सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार जांबोरी मैदान व डॉ. आंबेडकर मैदानाचे जतन केले जाणार आहे. चाळीतील जुन्या इमारतीचे ‘जैसे थे’ जतन करून म्हाडातर्फे संग्रहालय बनविण्यात येणार आहे. या माध्यमातून बीडीडी चाळींची माहिती व वारसा जतन केले केले जाणार आहे.
डिसेंबरपर्यंत 3989 घरे पूर्ण होणार
डिसेंबरपर्यंत वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव या तिन्ही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात 3,989 पुनर्वसन सदनिका पूर्णत्वास येणार आहेत. ना. म. जोशी मार्ग प्रकल्पामध्ये 2,560 निवासी व अनिवासी गाळे असून 14 इमारती बांधल्या जात आहेत. नायगाव येथे 3,344 निवासी व अनिवासी गाळे असून 20 इमारती उभारण्याचे काम सुरू आहे.
शिवसेनेच्या मागणीला यश
गणेशोत्सवापूर्वी बीडीडी- वासीयांना नव्या घराचा ताबा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीला यश आले असून बीडीडीवासीयांचा बाप्पा आता नव्या घरात विराजमान होणार आहे. या गृहप्रकल्पाला सुरुवात झाल्यापासून आदित्य ठाकरे दर महिन्याला प्रकल्पस्थळी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेत आहेत.