वरळी डीपी रोडच्या कामाला वेग, परळ, दक्षिण मुंबईच्या प्रवासाला गती येणार

407

परळ आणि दक्षिण मुंबईच्या प्रवासाला गती देणाऱया वरळी डीपी रोडच्या कामाला सध्या चांगलाच वेग आला आहे. या मार्गातील अतिक्रमणे हटवण्यास पालिकेने सुरुवात केली असून लवकरच हा मार्ग पूर्ण होणार आहे. हा मार्ग सागरी सेतूला जोडणारा असल्यामुळे वरळी परिसरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होऊन कॉर्पोरेट ऑफिस आणि रहिवाशांसाठी उत्तम सुविधा निर्माण होणार आहे.

मुंबईच्या विकास आराखडय़ातील तरतुदीनुसार वरळीचा हा रोड बांधण्यात येत आहे. हा रोड एका बाजूला अॅनी बेझंट जंक्शन तर दुसऱया बाजूला पांडुरंग बुधकर मार्गालाही जोडणार आहे. त्यामुळे हा मार्ग परळ आणि दक्षिण मुंबईत प्रवेश करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मार्ग ठरणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामात येणारी आणि तात्पुरत्या स्वरूपात विकासकांनी उभारलेली बांधकामे पालिकेने तोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संबंधित मार्गाच्या कामाला गती मिळणार असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे होतोय प्रशस्त रस्ता

शिवसेनेच्या पाठपुराव्यातून या रस्त्याचे काम केले जात आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार रस्त्याचे काम वेगाने होण्यासाठी माजी आमदार सचिन अहीर, सुनील शिंदे यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. यामुळे वरळी परिसरातील रहिवाशांची सोय होईल. व्यापार, उद्योग आणि विकासाला गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय पश्चिम उपनगरातून येणाऱयांसाठीही हा मार्ग फायदेशीर ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या