क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक, डान्समस्ती अंगाशी; वरळीत रेस्टॉरंट-पबचा परवाना रद्द

प्रातिनिधिक

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया व्यक्ती, मंगल कार्यालये आणि होम क्वारंटाईनचे नियम तोडणाऱयांविरोधात कठोर कारवाई सुरू असतानाच आता क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक जमलेल्या रेस्टॉरंट-पबवरही पालिकेने कारवाई सुरू केली आहे. वरळीत क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक जमवून डान्समस्ती करणाऱया रेस्टॉरंट-पबचा परवाना रद्द करण्यात आला असून रेस्टॉरंटच्या दोघा मालकांविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुण्यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच दंडात्मक कारवाई आणि पुन्हा नियम मोडणाऱयांविरोधात गुन्हा दाखल करण्यासारखी कठोर कारवाई पालिकेने सुरू केली आहे. वरळीत युनियन रेस्टॉरंट आणि पबमध्ये पालिकेने जाहीर केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक जमले होते. डान्स करतानाही सामाजिक अंतर पाळले जात नव्हते.

रेस्टॉरंट-पबमध्ये गर्दी करणाऱया लोकांवरही कारवाई व्हायला हवी!- महापौर

मुंबईत आता चाळी आणि झोपडपट्टय़ांमध्ये कोरोना आटोक्यात आला आहे. मात्र, उच्चभ्रू वस्ती आणि सोसायटय़ांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. लोकांनीही सामाजिक भान ठेवायला हवे. कोरोना काळातही जनजीवन सुरळीत राहावे म्हणून काही निर्बंध घालून सरकार आणि पालिकेने लोकांसाठी सुविधा पुन्हा सुरू केल्या आहेत. मात्र, आता लोकांना या निर्बंधांचे भान राहिल्याचे दिसत नाही. त्यामुळे रेस्टॉरंट-पबमध्ये गर्दी झाली तर मालकाप्रमाणे तिथे जमणाऱयांविरोधातही आता कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या