मोदींविरुद्ध लिहिल्याने राज्यसभेच्या सुरक्षा उपसंचालकाचे डिमोशन, पगारवाढीलाही कात्री

809

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट लिहिणे राज्यसभेच्या सुरक्षा उपसंचालकाला चांगलेच महागात पडले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्याची पदावनती म्हणजेच डिमोशन करण्यात आले आहे. त्याला उपसंचालक पदावरून हटवून कनिष्ठ सुरक्षा अधिकाऱयाचे पद देण्यात आले आहे. पाच वर्षांसाठी ही शिक्षा करण्यात आली असून त्या कालावधीतील पगारवाढीलाही तो मुकला आहे.

उरूजल हसन हे राज्यसभेत सुरक्षा उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक असे लिखाण सोशल मीडियावर केले होते. त्याचबरोबर त्यांनी राजकारणाशी संबंधित अनेक पोस्ट शेअरही केल्या होत्या. त्याबद्दल राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी हसन यांच्यावर डिमोशनची कारवाई केल्याची माहिती राज्यसभा सचिवालयाकडून देण्यात आली. तसे आदेश 12 फेब्रुवारी रोजी काढले गेले.

राज्य सभा सेवा अधिनियम 1957 आणि सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस नियमांनुसार कोणताही सरकारी कर्मचारी राजकीय कृत्यांमध्ये सहभागी होऊ शकत नाही, तसेच सरकारी कर्मचाऱयाला न शोभणारे काम करू शकत नाही.

हसन यांना पाच वर्षे पगारवाढ मिळणार नाही किंवा शिक्षा संपल्यानंतर त्यांना पुन्हा पूर्वीचे पद मिळणार नाही असे या आदेशात म्हटले आहे. हसन यांनी पंतप्रधानांबरोबरच काही केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधातही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे निदर्शनास आल्याचे या कारवाई आदेशात नमूद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या