>>मंगेश वरवडेकर
हिंदुस्थानी हॉकी संघाला सोनं जिंकता आलं नाही, पण आज कांस्यपदकाला गवसणी घालत त्यांनी 140 कोटी हिंदुस्थानींची मनं मात्र जिंकली. ऑलिम्पिकमध्ये गेला आठवडाभर होत असलेल्या आश्चर्यकारक आणि धक्कादायक निकालांमुळे एकेक करून हिंदुस्थानची पदके हुकत होती, चुकत होती. त्यामुळे अवघ्या हिंदुस्थानात निराशा पसरली होती. हिंदुस्थानात दंगल रंगली होती. अखेर स्पर्धेच्या तेराव्या दिवशी हॉकी संघाने हिंदुस्थानसाठी कांस्यपदक जिंकून आनंदाचा अनमोल क्षण दिला. शेवटच्या मिनिटापर्यंत हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या लढतीत कर्णधार हरमनप्रीतच्या दोन गोलांनी स्पेनचा 2-1 पराभव करत हॉकीने टोकियोपाठोपाठ पॅरिसमध्येही कांस्य किमया साधली. या पदकामुळे गेला आठवडाभर पदकाची आतुरतेने वाट पाहात असलेल्या हिंदुस्थानच्या पदक तालिकेत चौथ्या कांस्याची भर पडली.
पहिल्या आठवडय़ात नेमबाजांनी पदकांची बरसात करत हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक अभियानाला दणदणीत सुरुवात करून दिली होती. मात्र त्यानंतर ऑलिम्पिकच्या शर्यतीत हिंदुस्थानचे सारेच तारे एकेक करून निखळत असताना हॉकीने सुवर्ण पदकाचे स्वप्न दाखवले. पण तेसुद्धा उपांत्य लढतीतच भंगले. काल विनेश फोगाटही दुर्दैवीरीत्या सुवर्णपदकाच्या लढतीतून अपात्र ठरल्यामुळे हिंदुस्थानी पथकावर एकामागोमाग दुःखाचे डोंगर कोसळत होते. त्यामुळे आज हॉकी संघाकडून खूप मोठी आशा होती आणि त्यांनी धक्कादायक निकालांनी निराश झालेल्या हिंदुस्थानी चाहत्यांना कांस्यपदकाच्या रूपाने संस्मरणीय भेट दिली.
…अन् काळजाचा ठोका चुकला
पहिले सत्र गोल ठोकण्याच्या प्रयत्नात गेले. सुखजीत सिंगचा एक शॉट चुकला, अन्यथा फलकावर हिंदुस्थानची 1-0 अशी आघाडी दिसली असती. पण स्पेनच्या लुईस कालझाडोच्या बचावाचीही प्रशंसा करायला हवी. त्यानंतर दुसऱ्या सत्रात 18 व्या मिनिटालाच स्पेनच्या आक्रमणाला गोलपोस्टच्या समोर रोखण्याच्या प्रयत्नात हिंदुस्थानच्या बचावफळीकडून चूक झाली आणि रेफ्रींनी स्पेनला थेट पेनल्टी स्ट्रोकच बहाल केला. रेफ्रींनी पेनल्टी स्ट्रोकची खूण करताच स्टेडियममध्ये उपस्थित हजारो हिंदुस्थानी चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. स्पेनच्या मार्प मिरालेसने या संधीचा फायदा उठवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसरे सत्र स्पेनच्या आघाडीने संपण्याची चिन्हे असताना शेवटच्या मिनिटाला हिंदुस्थानला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगने त्या कॉर्नरवर गोल करत 1-1 अशी बरोबरी साधली.
श्रीजेशच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा
हिंदुस्थानी हॉकीची भिंत असलेल्या पीआर श्रीजेशने कांस्य पदकाच्या लढतीपूर्वीच आपली निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे श्रीजेशच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा करण्यासाठी हिंदुस्थानी खेळाडू मैदानात उतरले आणि जोशाने लढले. हिंदुस्थानच्या विजयानंतर त्यांनी हा विजय श्रीजेशच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा असल्याचेही अभिमानाने सांगितले आणि त्याला आपल्या खांद्यावर उचलून त्याला सन्मानाने निरोपही दिला.
हरमनप्रीतची पुन्हा कमाल
दुसऱ्या सत्रात बरोबरी साधल्यानंतर हिंदुस्थानचे लक्ष आघाडी मिळवण्यावर होते. हिंदुस्थानच्या आक्रमकांनी तिसऱ्या सत्राच्या प्रारंभापासून स्पेनच्या गोलपोस्टवर हल्ला करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या प्रयत्नांना तिसऱ्याच मिनिटाला यश लाभले. पुन्हा एकदा हरमनच्याच सुसाट स्ट्रोकने हिंदुस्थानला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. हा त्याचा स्पर्धेतील दहावा गोल होता. त्यानंतर हिंदुस्थानने आपला आक्रमक खेळ कायम राखत गोलसंख्या वाढवण्यासाठी जिवाचे रान केले, पण स्पॅनिश गोलकिपर आणि त्यांच्या बचावफळीने हिंदुस्थानचे प्रयत्न उधळून लावले.