मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डय़ांमुळे वाहतूकदारांचे रोजचे चार कोटींचे नुकसान,

>>राजेश चुरी

मुंबई-नाशिक महामार्ग सध्या पूर्णपणे खड्डय़ात गेल्यामुळे या मार्गावरून माल वाहतूक करणे वाहतूकदारांना दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे. वाहतूककाsंडीमुळे ट्रक-टँकरच्या इंधनाच्या वापरात सरासरी चाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे. अपघात आणि वाहने नादुरुस्तीचे आणि खर्चाचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. वाहतूकदारांना दररोज सरासरी चाळीस लाख रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. पण तरीही टोल वसुली सुरू राहिल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशारा ‘ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस’चे माजी अध्यक्ष व ‘कोअर कमिटी’चे चेअरमन बल मलकित सिंग यांनी दिली.

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डय़ांमुळे सध्या या महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. जोपर्यंत या मार्गावरील रस्ते व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत टोल आकारण्यात येणार नाही असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. पण अजूनही टोल वसुली सुरू आहे. वाहतूकदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे वाहतूकदार नाराज आहे. खड्डे व आर्थिक नुकसानीवर वाहतूकदारांच्या संघटनेचे नेते बल मलकित सिंह यांनी सविस्तर भाष्य केले.

खड्डय़ांची समस्या वाढली

यापूर्वी रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण तुलनेत कमी होते. पण आता रस्ते बांधणीसाठी वापरण्यास येणाऱया कच्च्या मालाचा दर्जा खराब झाला आहे. वाहतूक आणि पावसाचे प्रमाणही वाढले आहे, पण दुसरीकडे रस्त्यांची देखभाल वेळेवर होत नाही.

z या महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांमुळे  ट्रक-टेम्पोमधील सामानाचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान होते. वाहतुकीसाठी पूर्वी सरासरी पाच ते सहा तास लागत असत. पण आता नऊ ते दहा तासांनी पोहोचतात. अपघात आणि वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. खड्डय़ांमुळे प्रत्येक फेरीमागे वाहतूकदारांचे सरासरी पाच हजार रुपयांचे नुकसान होत आहे.