>>तुषार प्रीती देशमुख
तीन पिढय़ांमधील सर्व कुटुंबीयांनी कुटुंबासाठी चालवत असलेले ‘फॅमिली स्टोअर्स’ शिवराम जोशी यांनी सुरू केले. या व्यवसायात त्यांच्या पत्नी शैलजाताई यांनी कायम साथ दिली. त्यांच्या पश्चात हा व्यवसाय वाढवला. अशा या दुर्गेच्या रूपातील शैलजा शिवराम जोशी ताईंचा संघर्ष.
लग्न ठरवायच्या आधी नवरदेवाचे दुकान बघण्यासाठी मुलीकडचे कुटुंबीय मुंबईला आले. तेव्हा नवरदेवाने आधीच त्यांना सांगितले होते रूप, पैसा, शिक्षण या तीन गोष्टी माझ्याकडे नाहीत. त्यातून माझ्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. होणाऱया बायकोला सोनं देऊ शकत नाही, पण सोन्यासारखा संसार नक्कीच करू शकेन. ही सर्व सत्य परिस्थिती मुलीला सांगून मगच पुढचा विचार करावा असे सांगितले.
मुलीकडच्यांकडून होकार आला. रेशनिंगचे दिवस चालू असताना दोघांचे लग्न झाले. तेव्हा लग्नमंडपात दहापेक्षा अधिक माणसांना भोजनाचे निमंत्रण नसल्यामुळे काहींची भोजनालयात सोय करावी लागली होती, तर काही घरच्या मंडळींसाठी घरात स्वयंपाक चालू होता. नव्या नवरीचा गृहप्रवेश होताच, तिने स्वयंपाकघरात हातभार लावून वरणाला खमंग फोडणी देऊन चविष्ट आमटी करून सगळ्यांचे मन जिंकले. आजतागायत त्याच आमटीची चव घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील व मित्र परिवारातील सर्वच जण आतुर असतात. आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व अडीअडचणींना सामोरे जाऊन त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचा वसा जणू तिने स्वीकारला होता.
कोकणाहून मुंबईत नशीब आजमावायला आलेल्या शिवराम जोशी यांनी प्रचंड कष्ट करून मुंबईत दादरमध्ये एक जागा किराणामालाचे सामान विकण्यासाठी घेतली. त्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. व्यवसाय करण्यासाठी किराणामालाने दुकान भरलेले असावे लागते. पण सामान भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. अशा वेळी मोठय़ा बॉक्समध्ये एखादी वस्तू ठेवून गिऱहाईकांना आपल्याकडे खरेदीस येण्यासाठीची युक्ती त्यांनी केली. झालेल्या विक्रीमधून आणखी सामान खरेदी केले आणि हळूहळू वस्तूने दुकान भरू लागले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे एकाच व्यवसायातून उदरनिर्वाह शक्य नव्हता. त्यांनी अनेक जोड व्यवसाय केले. अडीअडचणींना सामोरे जात व्यवसाय पुढे नेण्याचे ठरवले. त्यात त्यांना मोलाची साथ लाभली ती पत्नी शैलजा जोशी यांची.
शैलजाताईंनी आपल्या पतीच्या अडीअडचणींना साथ देत खंबीरपणे येणाऱया सर्व संकटांवर मात करून पुढे जाण्याचे ठरवले. दुकानात विक्रीसाठी लागणारी अनेक घरगुती पिठे, लोणची, मसाले असे अनेक पदार्थ शैलजाताई घरी करत आणि विक्रीसाठी ठेवत. या घरगुती वस्तूंना अधिक मागणी येऊ लागल्या. नंतर कुटुंबातील व्यक्तींना नोकरी दिल्या. ‘फॅमिली स्टोअर्स’ने अनेक गरजू कुटुंबांकडून घरगुती खाद्यपदार्थ विकत घेऊन आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवून त्यांना आधार देण्याचे कार्य केले.
शैलजाताई स्वतः सर्व प्रकारची पीठे, लोणची, मसाले यांची योग्य प्रमाण देऊन त्यांच्याकडून बनवून घेत असत. दुकानात कामाला असलेल्या सर्व कामगारांसाठी शैलजाताई जेवणाचा डबा पाठवत असत. ग्राहकांचे सणवारही आनंदाने साजरे व्हावे यासाठी त्यांना लागणाऱया सर्व जिन्नस आपल्या दुकानात उपलब्ध करून देत. त्यांच्या आनंदात आपलाही सण त्यांनी अशा प्रकारे साजरा केला. गणपतीसाठी लागणारे उकडीचे मोदक, नवरात्रीत लागणारी खिरापत, होळीसाठी लागणाऱया पुरणपोळ्या असो वा दिवाळीचा फराळ… असे अनेक पदार्थ शैलजाताई मदतनीस महिलांच्या सहकाऱयाने घरी बनवत आणि दुकानात विक्रीसाठी ठेवत. आपल्याला दोन घास कमी जेवायला मिळाले तरी चालतील, पण केलेल्या स्वयंपाकात सगळ्यांचे पोट भरले पाहिजे अशा शैलजाताईंच्या संस्कारामुळेच दुकानातील प्रत्येक कामगारासाठी त्या घरून जेवणाचे डबे पाठवत.
शिवराम जोशी व शैलजाताईंची अफाट मेहनत, एकमेकांची साथ, कुटुंबासाठी असलेले प्रेम, समाजाप्रती असलेली कर्तव्यपूर्ततेची ओढ या सगळ्याचे त्यांना मिळालेले फलित म्हणजे त्यांचा मुलगा शेखर जोशी. ज्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय नुसता चालू ठेवला नाही तर वडिलांच्या खांद्याला खांदा लावून नव्या व्यवसायात पदार्पण केले. सून कला जोशी यांनी सर्व काही शिकून घेत सासूबाईंच्या मदतीने संसाराची धुरा सांभाळली. सासू-सुनेने बनवलेले घरगुती खाद्यपदार्थांची विक्री दुपटीने वाढू लागली. नंतर व्यवसायाचा डोलारा इतका वाढला की, संपूर्ण कुटुंब दुकानात व्यस्त होऊ लागले. शेखर जोशी यांचे दोन्ही सुपुत्र अभिजीत जोशी व योगेश जोशी यांनीदेखील दुकानातील जबाबदाऱया स्वीकारल्या.
तसेच कलाताईंच्या दोन्ही सुना व शैलजाताईंच्या नातसुना गायिका केतकी जोशी व भाग्यश्री जोशी यादेखील सर्व शिकून जमेल तशी त्यांना मदत करू लागल्या. शैलजा ताईंची पणती झी-मराठी ‘सारेगमप’ फेम गायिका स्वरा जोशी हिलादेखील नवीन पदार्थ करण्याची प्रचंड आवड आहे. जोशी कुटुंबाच्या तीन पिढय़ांनी चालवलेले ‘फॅमिली स्टोअर्स’ ग्राहक हेच आपले दैवत मानणारे आहे. पतीच्या या विचारांना उजाळा देत वयाच्या 88 व्या वर्षी तितक्याच ऊर्जेने शैलजाताई आजदेखील दुकानाच्या गल्ल्यावर नित्यनियमाने येऊन बसतात. काही पदार्थ आजही त्यांच्या देखरेखीखाली बनवले जातात. अशा या दुर्गेच्या रूपातील शैलजा शिवराम जोशीताईंचा संघर्ष उंच भरारी घ्या असे सांगणारा आहे.
[email protected]
(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)