‘याहू’ने चीनमधून गाशा गुंडाळला, जाणून घ्या काय आहे कारण….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘याहू’ने चीनमधील आपल्या सर्व सेवा बंद केल्या आहेत. व्यावसायिक आणि कायदेशीर आव्हानांमुळे याहूने चीनमधून काढता पाय घेतल्याचे जाहीर केले आहे. चीनमधील स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे की, 1 नोव्हेंबरपासून कंपनीने चीनमधील युजर्ससाठी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीचा हा निर्णय मुख्यत्वे प्रतीकात्मक आहे, कारण याहूच्या अनेक सेवा आधीच चीनच्या ‘डिजिटल सेन्सॉरशिप’ने बंद केल्या आहेत. अलीकडेच चीन सरकारने देशांतर्गत मोठ्या कंपन्यांसह अनेक टेक कंपन्यांवर आपले नियंत्रण वाढवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. यामुळे याहूने चीनमध्ये आपल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असावा असं बोललं आज आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, “चीनमध्ये व्यवसाय करण्याच्या वाढत्या आव्हानात्मक कायदेशीर पैलूंमुळे, याहू सेवा यापुढे 1 नोव्हेंबरपासून चीनमध्ये उपलब्ध होणार नाही. युजर्सच्या हक्कांसाठी आणि फ्री इंटरनेट सेवांसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” तंत्रज्ञान, व्यापारावरून अमेरिका आणि चीन सरकारमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, याच वर्षी ‘गुगल’ने देखील चीनमध्ये आपल्या सर्व सेवा बंद केल्या आहेत.