यवतमाळमध्ये भीषण अपघातात 8 ठार, 19 जखमी

653

अस्थीविसर्जन करून परत येत असताना मालवाहू वाहनाची झाडाला धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ ठार, तर 19 जण जखमी झाले. कळंब-जोडमोहा मार्गावर वाढोणा गावाजवळ रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना कळंब आणि यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

जोडमोहा येथील बाबाराव वानखडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचे नातेवाईक कोटेश्वर येथील नदीपात्रात अस्थीविसर्जनासाठी गेले होते. तेथील अस्थीविसर्जनाचा विधी आटोपून ते जोडमोहाकडे परत होते. याचवेळी त्यांच्या गाडीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी झाडावर आदळून रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट भागात कोसळली. गाडीमध्ये एकूण 21 जण प्रवास करीत होते. या भीषण अपघातात महादेव बावनकर (53), किसन कळसकर (55), महादेव चंदनकर (58), वाहनचालक अमर आत्राम (32) आणि गणेश चिंचाळकर (52) यांच्यासह आठजण जागीच ठार झाले. तीन मृतांची नावे कळू शकलेली नाहीत. अपघातात इतर 19 जण गंभीर जखमी झाले आहेत.

काही काळासाठी वाहतूककोंडी
अपघातामुळे कळंब-जोडमोहा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती कळताच गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. जोडमोहा येथील तिघांचा अपघातात मृत्यू झाल्याने या गावावर शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या