>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात काल काही ठिकाणी जोराचा तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे पांढरकवडा तालुक्यात खुनी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. नदीच्या प्रवाहात एक इसम अडकून पडला होता. रात्री उशीरा या इसमास जिल्हा शोध व बचाव पथक सुरक्षितपणे बाहरे काढले.
जिल्ह्यातील वणी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला होता. पांढरकवडा तालुक्यातील खुनी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे नदीच्या पात्रात इसम अडकल्याची सुचना तेथील तहसिलदारांनी रात्री जिल्हा शोध व बचाव पथकास दिली होती. सदर व्यक्तीस तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी कळविले होते.
तहसिलदाराच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी जिल्हा शोध व बचाव पथकास तातडीने रवाना होऊन बचाव मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे रात्री पथक खुनी नदीच्या घटनास्थळी पोहोचले.
नदीच्या प्रवाहात अस्का लाईटच्या प्रकाशात सदर व्यक्तीस दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात आली. रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी प्रवाहात अडकलेल्या सोनबर्डी येथील दशरथ शंकर गौत्रे या व्यक्तीस बाहेर काढण्यात आले. रात्रीच्या अंधारात अपुऱ्या प्रकाशात बचाव पथकाने ही कामगिरी पार पाडली.