व्वा रे सरकार… लाडक्या बहिणीचे पैसे आले लाडक्या भावाच्या खात्यात, प्रशासनाचा अजब प्रकार

>> प्रसाद नायगावकर

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत राज्य सरकार प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रुपये देणार आहे. 15 ऑगस्टला दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले.पण यवतमाळच्या आर्णीत ही रक्कम चक्क एका भावाच्या खात्यात जमा झाली आहे विशेष म्हणजे, या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली होती.

हा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे यवतमाळ जिल्ह्याच्या आणि येथे. जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. जाफर हा आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहे. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख याने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता आणि नियमानुसार भरणे शक्यही नव्हते . तरीही त्याच्या बँक ऑफ बडोदा या बॅक खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये शासनाने जमा केले आहे. जाफर यांना तसा मोबाईलवर .खात्यात 3000  रुपये जमा झाल्याचा मेसेज प्राप्त झाला .जाफर यांनी तात्काळ बँकेत जाऊन आपले खाते तपासले असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत 3000 रुपये जमा झाल्याची नोंदही बँक स्टेटमेंट मध्ये आढळली. या प्रकाराने खुद्द जाफरही चक्रावून गेला आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजनांची घोषणा केली जात आहे.सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राजकीय उद्देशानेच जाहीर केल्याचा आरोप करीत मुळात ही योजनाच फसवी आहे असेही विरोधकांचे म्हणणे आहे