
>>प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तहसील येथे मृत्युच्या दाखल्यासाठी लिपिकाने पैशांची मागणी केली. तक्रारदाराने या लिपिकाचे स्टिंग ऑपरेशन केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून महसूल विभागाने याची दखल घेत लिपिकाला तत्काळ निलंबित केले आहे.
बाळू पवार असं या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. बाळू हा जन्म मृत्यू विभागातील सेतू येथे कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी गजानन तोडक यांनी पुसद तहसिल कार्यालयात वडिलांच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी रीतसर अर्ज सादर केला. गजानन तोडक यांचे वडील तुकाराम यांचा मृत्यू 29 फेब्रुवारी 1974 ला झाला होता. काही कारणास्तव त्यांच्या मृत्युची नोंद करण्यात आली नव्हती. मात्र आता कामासाठी गजानन यांना आपल्या वडिलांच्या मृत्युच्या दाखल्याची आवश्यकता होती. वारंवार विनंती करूनही बाळू पवार हा लिपिक दाखला देत नव्हता. शेवटी कंटाळून गजानन यांनी या लाचखोर लिपिकाचे कामासाठी पैसे मागण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
View this post on Instagram
गजानन यांनी हा व्हिडिओ पुसद तहसीलदार महादेव जोरवार यांना दाखविला. तहसीलदार महादेव जोरवार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बाळू यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महसूल विभागास पाठवला आणि बाळू यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले.