>>प्रसाद नायगावकर
संपूर्ण हिंदुस्थानात प्रतिबंधित असलेली बियाणे विक्रीकरिता यवतमाळ जिल्ह्यात आणण्यात आली होती. संबंधित बियाणे जिल्ह्यात विक्रीकरिता आणल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी व कृषी विभागाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रतिबंधित बियाण्यांचे गुजरात कनेक्शन असल्याचे माहितीत उघड झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात देशामध्ये प्रतिबंधित असलेली बियाणे विक्रीसाठी आणण्यात आली होती. मारुती सुझुकी एर्टीगा या गाडीमधून बियाणे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर कृषी विभागाचे भरारी पथक आणि पोलिसांनी मिळून दारव्हा दिग्रस रोडवर साफळा रचला व आरोपींना ताब्यात घेतले. एर्टीगा गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये सरकारने प्रतिबंधित केलेली बुलंदी कॉटन हायब्रीड सिड्स, एके 47 कॉटन हायब्रीड सिड्स, एके 56 कॉटन हायब्रीड सिड्स, त्रिनेत्र अनमोल कॉटन हायब्रीड सिड्स, त्रिनेत्र शिवा कॉटन हायब्रीड सिड्स चे पाकीटे आढळून आली. पोलिसांनी एकूण 6 लाख 30 हजार रुपयांची प्रतिबंधित बियाणे जप्त केले आहेत.
सदर घटनेमध्ये शिवाजी सिताराम आडे, नरेंद्र तुळशिराम राठोड, हिरासिंग गणेश राठोड, अवधुत मारोती जाधव, नितीन गोपीचंद पवार, मोहन कनिराम राठोड या आरोपींना अटक करण्यात आले आहे. हे सर्व आरोपी महागाव तालुक्यातील आहेत. सदरचे बियाणे कोठून आणले याबाबत विचारपुस केली असता त्यांनी ते बियाणे नरेंद्र मफतलाल पटेल उर्फ मंगलभाई पटेल रा.भाउपुरा ताडी जि. मैसाना राज्य गुजरात यांच्याकडून विक्री करीता आणल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बियाण्यांसह एकूण सुमारे 17 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.