यवतमाळमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, तीन मुलींसह वडिलांचा मृत्यू

यवतमाळमधील वणी-घुग्गुस मार्गावर लालगुडा गावाजवळ ओम नगरी येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास भरधाव ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात वडिलांसह तीन मुलींचा मृत्यू झाला, तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

रियाजुद्दीन शेख (५५), मायरा शेख (१७) जोया शेख (१३) अनिबा शेख (११)​ असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर ​इनाया शकिरुद्दिन शेख (५) असे गंभीर जखमी मुलीचे नाव आहे. वणी येथील भीमनगर परिसरात राहणारे रियाजुद्दीन शेख यांचे लाल पुलिया परिसरात गॅरेज आहे. सध्या सुटी असल्याने ते त्यांची मुलगी मायराला (17) कार शिकवत होते.

३१ ऑक्टोबर, शुक्रवारी सकाळी ते त्यांच्या तीन मुली आणि भावाच्या एका मुलीला (इनाया) सोबत घेऊन स्कोडा कार ०१ एएच ५७०० ने घुग्गुस रोडवर गेले होते. मायरा (१७) ही कार चालवत होती. लालगुड्याच्या आधी ओम नगरी जवळ डीपी रोडवर कार वळण घेत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा ड्रायव्हर बाजूकडील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना कारमधून बाहेर काढले. सर्वांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी मायरा, जोया आणि अनिबा यांना मृत घोषित केले. वडील रियाजुद्दीन शेख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. भावाची मुलगी इनाया (५) ही गंभीर जखमी झाल्याने तिला चंद्रपूर आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. या दुर्देवी घटनेमुळे वणी परिसरात शोककळा पसरली आहे.