येवल्याचे पैठणी केंद्र पर्यटकांचे आकर्षण ठरणार!

सामना प्रतिनिधी , येवला

पतंग व पैठणी महोत्सवाच्या माध्यमातून येवला पैठणी पर्यटन केंद्र पर्यटकांचे आकर्षण होण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ प्रयत्नशील असल्याचे महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी सांगितले.

येवला पैठणी पर्यटन केंद्रास महाराष्ट्र राज्याचे पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी नुकतीच भेट दिली असता पैठणी पर्यटन केंद्राची इमारत अतिशय सुंदर असून पैठणी केंद्र हे अतिशय सक्षम असल्याचे सांगितले.

राठोड यांनी पर्यटन केंद्रातील वेगवेगळय़ा पैठणी साडय़ांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. पैठणी साडीवर हस्तकला व हातमागाच्या माध्यमातून अतिशय सुंदर नक्षीकाम रेखाटले जात असल्याने या सुंदर कलेला व त्याच्या कारागिरांना अजून पर्यटन विकास महामंडळाकडून हे केंद्र जास्तीत जास्त विकसित होण्यासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या सहकार्यातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सागितले. इतर कालगुणांना वाव देऊन पतंग व पैठणी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटकांचे ते प्रमुख केंद्र व्हावे म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटन केंद्राच्या प्रसिद्धीसाठी जाहिरातीच्या माध्यमातून व पर्यटन विभागाच्या वेगवेगळय़ा उपक्रमांच्या माध्यमातून येवला पैठणी पर्यटन केंद्राचा उल्लेख व सहभाग करून या ठिकाणी चर्चासत्र घडवून सरकारच्या पर्यटन उपक्रमाचा फायदा या केंद्राला देणार असल्याचे सांगितले. पारंपरिक रेशम पर्यटन व त्याला आधुनिकतेचा साज चढवून त्याचा सुंदर मिलाप करून येथील सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन सहाय्यक संचालक आशुतोष राठोड यांनी दिले. याप्रसंगी येवला पैठणी पर्यटन केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पैठणी क्लस्टरचे कार्यकारी संचालक प्रवीण पहिलवान, विनोद बाकळे, संजय विधाते, सुरेश कुंभारे, सुनील भावसार, दत्ता मुंगीकर, राकेश कुंभारे उपस्थित होते.