यंदा अवतरणार ‘व्हॅक्सिन बाप्पा’; नाशिकच्या योगेश टिळे यांनी साकारली मनमोहक मूर्ती

कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावे यासाठी प्रतिबंधक लसीकरण आणि नियमांचे काटेकोर पालन करा, हाच संदेश या गणेशोत्सवात देण्यासाठी लाडके श्री गणराय आपल्या हातात व्हॅक्सिन, सीरिंज, मास्क आणि सॅनिटायझर ही आयुधं घेऊन आले आहेत. हे ‘व्हॅक्सिन बाप्पा’ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. ही आगळीवेगळी मूर्ती नाशिकचे मूर्तिकार योगेश टिळे यांनी साकारली आहे.

जगावर कोरोनाचे संकट कायम आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहेत. हे विघ्न दूर करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण, लस घेतल्यानंतर कायम मास्क, सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे. याबाबत शासन, प्रशासन स्तरावरून कायम कळकळीचे आवाहन केले जाते. मात्र, अजूनही काही भागांत लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये गैरसमज कायम आहेत. लसीकरण करून घ्या, मास्क कायम वापरा हे जनमनावर बिंबवण्यासाठी टिळे यांनी ही मूर्ती साकारली आहे.

प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाला प्रबोधनाच्या उद्देशाने वेगळी मूर्ती साकारण्यात योगेश टिळे यांचा हातखंडा आहे. याआधी 2019 ला त्यांनी हेल्मेट बाप्पा साकारले होते, तर मागील वर्षी कोरोना योद्धय़ांप्रति कृतज्ञता व्यक्त केली होती. यावेळी त्यांचे ‘व्हॅक्सिन बाप्पा’ लक्षवेधी ठरणार आहेत. ही सवा फूट उंचीची शाडू मातीतील मूर्ती त्यांच्या कॉलेजरोड येथील स्टॉलवर ठेवण्यात आली आहे. श्री गणरायाच्या चार हातांमध्ये व्हॅक्सिनची बाटली, सिरींज, मास्क व सॅनिटायझर आहेत. योग्य काळजी घेतली नाही तर हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही हे दर्शवण्यासाठी त्यांनी मखरीत इंजेक्शन्सचा वापर केला आहे.

वारकरी बाप्पाही लक्षवेधक

यंदा त्यांनी वारकरी रूपातील श्री गणेशाची मूर्ती घडवली आहे. ही मूर्ती एक फूट आहे. तुळशीच्या माळा घातलेले, हाती टाळ असलेले हे गणेशाचे रूपदेखील गणेशभक्तांना आकर्षित करीत आहे.

मी कलेच्या माध्यमातून हा जनजागृतीचा प्रयत्न केला आहे. कोरोनाविरुद्ध लढणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असून नागरिकांनी सर्व कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
– योगेश टिळे, मूर्तिकार

पूरग्रस्त महाडमध्ये शिवसेनेचे 100 विघ्नहर्ता, विलेपार्ले विधानसभेच्या वतीनेश्रींच्या मूर्ती भेट

अतिवृष्टी आणि महापुराच्या विघ्नाचा सामना केलेल्या महाडमध्ये शिवसेनेच्या वतीने 100 विघ्नहर्ता गणेश स्थापन होणार आहेत. महाडमधील ग्रामस्थांना गणेशोत्सवासाठी विलेपार्ले विधानसभेच्या वतीने ‘श्रीं’च्या 100 मूर्ती भेट म्हणून पाठवण्यात येणार आहेत.

महाडमध्ये पुरामुळे मूर्तिशाळांचेही अतोनात नुकसान झाले. गणपतींच्या घडवलेल्या शेकडो मूर्ती पुराच्या पाण्यामुळे खराब झाल्या. अशा परिस्थितीत महाडवासीयांना गणेशोत्सवासाठी गणपतींच्या मूर्ती देण्याची संकल्पना राज्याचे परिवहनमंत्री ऍड. अनिल परब, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी प्रत्यक्षात आणली आहे. या उपक्रमाचे आयोजक असलेले डिचोलकर आणि अन्य शिवसैनिक या गणेशमूर्ती घेऊन महाडला रवाना होणार आहेत. महाडमधील नाखली, मोपरा, अकला, भोराव, दातली आदी गावांमधील ग्रामस्थांना या मूर्ती भेट देण्यात येणार आहेत.

कुर्ल्यातून निघणारबॉर्डरचा राजा

हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरही गणेशोत्सव दणक्यात साजरा होतो. हिंदुस्थानी जवानांच्या वतीने या गणपतीची स्थापना केली जाते. हा ‘बॉर्डरचा राजा’ कुर्ल्यातील सिद्धिविनायक चित्रशाळेत घडवला गेला असून लवकरच तो रवाना होणार आहे. सिद्धिविनायक चित्रशाळेत यंदा या गणेशोत्सवासाठी हिंदुस्थान-पाकिस्तान बॉर्डरची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. शिवसेना उपविभागप्रमुख संजय दरेकर व शाखा अधिकारी अजित घगवे आणि सर्व शिवसैनिकांनी या चित्रशाळेला भेट देऊन ईशरदीदी यांचे मनोबल वाढवले.

आपली प्रतिक्रिया द्या