तीन वर्षांनंतरही अन्न राहणार ताजं

सामना प्रतिनिधी । मुंबई

इडली, उपमा, ढोकळासारखे पदार्थ आता तीन वर्षे ताजे राहणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. वैशाली बंबोले यांनी याबाबत संशोधन केले आहे. पदार्थांमध्ये कोणतेही इतर घटक (प्रीझर्व्हेटिव्ह) न टाकता ते ताजे राहणार आहेत.

डॉ. वैशाली यांचे संशोधन लष्कर आणि अंतराळवीरांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जात आहे. अनेक वेळा युद्ध किंवा आपत्कालीन स्थितीत लष्कराला अन्न पोचत नाही. एवढेच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापनाच्या काळातही अन्न पोचवणे खूप कठीण असते. अशावेळी लष्कराला अन्नाची पाकिटे दिली जातात, मात्र त्यातील अन्न फक्त 90 दिवस ताजे राहू शकते. त्यामुळे वैशाली आणि त्यांच्या सहकाऱयांनी शोधलेल्या संशोधनाचे जगभरात कौतुक होत आहे. डॉ. वैशाली इलेक्ट्रॉन बीम इरिडेशन तंत्रावर गेली 15 वर्षे काम करीत आहेत. त्या सांगतात, मी इलेक्ट्रॉन बीम इरिडेशनचा केमिकल पॉलिमेरीझेशनसाठी कॅटॅलिस्ट म्हणून वापर करीत आहे. त्यामुळे अन्नाला कुठलाही प्रादुर्भाव होत नाही आणि अन्नपदार्थांचे आयुष्य वाढते. सध्या डॉ. वैशाली या संशोधनाचे पेटंट करण्याच्या कामात व्यस्त आहेत.

कसे केले संशोधन
डिसेंबर 2015पासून अनोख्या तंत्राद्वारे अन्नपदार्थांचे टेस्टिंग सुरू करण्यात आले. चाचणीसाठी 300 इडली, 350 सफेद ढोकळा आणि पाच किलो रवा वापरण्यात आला. हे खाद्यपदार्थ नॅनो लॅबोरेटरीमध्ये तयार करण्यात आले. त्यानंतर इलेक्ट्रॉन बीम इरिडेशन त्या खाद्यपदार्थांवर लागू करण्यात आले. त्या खाद्यपदार्थांचे विशेष पॅकेज तयार करण्यात आले. ते पॅकेट्स रेफ्रिजेरेटरमध्ये ठेवण्यात आले. वेळोवेळी त्यांची मायक्रोबायल, केमिकल तपासणी करण्यात आली. डिसेंबर 2018 साली सर्व इडली, डोसा एकदम ताजे असल्याचे आढळले. त्यांच्या चवीत कोणताही फरक पडलेला नव्हता.

बीम इरिडेशन तंत्रामुळे वाफवलेल्या पदार्थांतील जीवाणू संपुष्टात येतात आणि पदार्थ खराब होत नाहीत. इडली, ढोकळासारखे हिंदुस्थानी अन्नपदार्थ तब्बल एक हजार दिवस टिकू शकतात. लष्कराला, अंतराळवीरांना, नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या लोकांना या संशोधनाचा फायदा होऊ शकतो.
-डॉ. वैशाली बंबोले, मुंबई विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या प्रा. वैशाली बंबोले यांचे संशोधन