
<< विजय जोशी
नांदेड शहरात हत्येची मालिका सुरूच असून गेल्या 70 तासांत तब्बल पाच खून झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी पहाटे श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुमार दुकानाशेजारी असलेल्या गल्लीत सोनू कल्याणकर या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करत सोनूला संपवले. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी रोहित लोट नावाच्या तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी आहे याचा शोध सुरु आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्री तिहेरी हत्याकांड घडले, त्यानंतर रविवारी आणखी एका तरुणाचा खून झाला आणि आज पहाटे पाचवी हत्या घडल्याने नांदेडमध्ये सुरू असलेली हत्येची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. शहरातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
मृत सोनू कल्याणकर हा एका पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचा सुपुत्र असल्याची माहिती समोर आली आहे. गोलू मंगनाळे नावाच्या व्यक्तीसोबत त्याचे जुने वाद असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू असून ही हत्या त्याच पार्श्वभूमीवर झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांनी अधिकृतरित्या कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. सलग घडणाऱ्या या गंभीर गुन्ह्यांमुळे नांदेड शहरातील कायदा-सुव्यवस्था यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांनी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.


























































