बंगालमधील तरुणांना विचित्र व्यसन, नशेसाठी करतात कंडोमचा वापर

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर शहरात कंडोमची विक्री अचानक वाढली आहे. दुकानात कंडोम विक्रीसाठी येताच साठा संपत आहे. कारण पश्चिम बंगालमधील दुर्गापूर शहरात सध्या तरुणांना एक विचित्र व्यसन लागले आहे. तेथील काही तरुण नशेसाठी कंडोम वापरत आहेत. तरुणांमधील या नव्या व्यसनामुळे प्रशासनही चिंतेत आहे.

असुरक्षित लैंगिक संबंधांपासून संरक्षण होण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो, मात्र येथील तरुण त्याचा वापर ड्रगप्रमाणे करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दुर्गापूरमधील दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, बेनाचिती आणि मुचीपारा, सी झोन, ए झोन अशा विविध भागात फ्लेवर्ड कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे आश्चर्यचकित झालेल्या एका स्थानिक दुकानदाराने वारंवार कंडोम खरेदी करणाऱ्या तरुणाला विचारले. तर मी नशेसाठी ते विकत घेतो, असे आश्चर्यकारक उत्तर त्याने दिले. दुर्गापूर येथील एका मेडिकल स्टोअरचालकाने सांगितले की, पूर्वी दिवसाला केवळ 3 ते 4 पॅकेट कंडोम विकले जात होते, परंतु आता पूर्ण पॅक विकले जात आहेत.

तज्ज्ञांच्या मते कंडोममध्ये एक सुगंध असतो. त्याची नशेखोर नशा करतात. त्यांनी सांगितले की हे सुगंधी संयुग डेंड्राइट गममध्ये देखील आढळते. त्यामुळे अनेक लोक नशेसाठी डेंड्राइटचाही वापर करतात. गरम पाण्यात कंडोम जास्त वेळ भिजवून ठेवल्याने नशा होते. नशेसाठी विचित्र गोष्टी वापरण्याची ही पहिलीच घटना नाही. 21 व्या शतकाच्या मध्यात, नायजेरियामध्ये टूथपेस्ट आणि शूच्या शाईची विक्री अचानक वाढली होती. यावेळी लोक त्याचा नशेसाठी वापर करत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.