Mumbai News : रागाने पाहिले म्हणून संताप अनावर, जिम ट्रेनरकडून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण

मुंबईतील मुलुंड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिममध्ये आलेल्या तरुणाने रागाने पाहिले म्हणून ट्रेनरने त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, पीडित 20 वर्षीय तरुण बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे जिमला गेला होता. तरुणासोबत इतर लोक तेथे व्यायाम करत होते. व्यायाम करत असतानाच अचानक जिम ट्रेनरने लाकडी दांड्याने त्याला मारहाण करण्यास सुरवात केली.

जिममधील इतर लोकांनी मध्यस्थी करत तरुणाला वाचवले. मात्र तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत जिम ट्रेनरला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता तरुणाने आपल्याकडे रागाने पाहिले म्हणून त्याला मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.