पनवेलहून रत्नागिरीला फिरायला गेलेल्या तरुणाचा आरे-वारे समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. सिद्धेश विनायक फासे असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. एकाला वाचवण्यात यश आले आहे.
पनवेल येथील फासे कुटुंब आज (शनिवारी) रत्नागिरी येथे आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. यावेळी सिद्धेश फासे हा 19 वर्षीय तरुण समुद्राच्या पाण्यात मजा करत होता. यावेळी एक मोठी लाट आली आणि सिद्धेश लाटेबरोबर पाण्यात ओढला गेला.
फासे कुटुंबासोबत आलेल्या प्रदीप बिरासदार यांनी सिद्धेशला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रदीपही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी किनाऱ्यावरील इतर पर्यटकांनी आरडाओरडा केला असता सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. सुरक्षारक्षकांनी पाण्यात बुडणाऱ्या प्रदीपला सुखरुप बाहेर काढले, मात्र सिद्धेशला वाचवता आले नाही. सिद्धेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.