संभाजीनगरमध्ये नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू; मनपाच्या आयुक्तांना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर परिसरात गुरुवारी रात्री नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पावसातून बुलेटवरून घरी परतत असताना नाला उघडा असल्याने अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना घडली. चेतन चोपडे (३८) असे मृत तरुणाचे नाव आहे. नाल्यात पडून मृत्युमुखी पडल्याची ही दुसरी घटनी असल्यामुळे संतप्त नागरिकांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना मारहाण केली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.

संभाजीनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री धुवांधार पाऊस झाला. या पावसाने शहरातील नाले दुथडी भरून वाहू लागले होते, तसेच अनेक सखल भागांतही पाणी साचले होते. सिडको भागात एके ठिकाणी नाला ओव्हरफ्लो झाला होता. त्याच रस्त्यावरून परतणाऱ्या चेतनला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे बुलेटसह तो नाल्यात पडला आणि नाल्याच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवसेनेचे मनपा गटनेते मकरंद कुलकर्णी व नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तातडीने अग्निशमन दल व मनपाच्या पथकाला पाचारण केले. पाण्यावर तरंगणाऱ्या आधार कार्डाच्या मदतीने चेतनची ओळख पटण्यास मदत झाली. अग्निशमन दलाच्या पथकाने पाऊण तास शोध घेतल्यानंतर चेतनचा मृतदेह शोधण्यात यश आले.

संतप्त नागरिकांकडून आयुक्तांना मारहाण

सिडको भागातील नाल्यांची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गेले होते. पंरतु तेथे गेल्यावर त्यांना संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त नागरिकांनी वारंवार पालिकेकडे शहरातील उघड्या नाल्यांवर जाळी टाकण्याची मागणी करून देखील मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. मनपाच्या निष्काळजीपणामुळेच तरुणाचा बळी गेला असल्याचे म्हणत रवी गायकवाड यांनी अतिरिक्त आयुक्त भालसिंग यांना मारहाण केली. नगरसेवक मकरंद कुलकर्णी, शिवाजी दांडगे, विरभद्र गादगे यांनी तातडीने धाव घेऊन अतिरिक्त आयुक्तांना संरक्षण दिले. याप्रकरणी श्रीकृष्ण भालसिंग यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून रवी गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.