
सांस्कृतिक नगरी डोंबिवलीतील फडके रोड गर्दीने ओव्हरपॅक झाला होता. निमित्त होते दिवाळी पहाटचे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर तरुण-तरुणींपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वांची पावले वळली ती प्रसिद्ध फडके रोडकडे. चौकाचौकात काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या.. आकर्षक आकाशकंदील आणि मनाला प्रसन्न करणारे गाण्यांचे सूर यामुळे सारा माहोल दिवाळीमय झाला होता. पारंपरिक वेशात अवघी तरुणाई एकवटली. मित्रमैत्रिणींनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या निमित्ताने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फडके रोडवर एकत्र येत आनंदोत्सव साजरा करणे ही डोंबिवलीची खास परंपरा. यंदाही ही परंपरा जपण्यात आली. ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात पहाटेपासूनच मोठी रांग लागली होती. मंदिराच्या प्रांगणामध्ये तसेच फडके रोडवर तुफान गर्दी झाली होती. ३० वर्षांपूर्वी गणेश मंदिर संस्थानने युवा भक्ती-शक्ती दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आजदेखील दिवाळीच्या निमित्ताने युवकांची भक्ती आणि शक्ती याचा अनोखा संगम दिसून आला.
बऱ्याच वर्षांनंतर अनेक मित्र व मैत्रिणी एकमेकांना दिवाळीच्या निमित्ताने भेटले. शुभेच्छांचा वर्षाव झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. अमळनेर येथून आलेले डॉ. अक्षय कुळकर्णी यांच्या शंखनादाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. दिवाळी सेलिब्रेशनसाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.