दादरमध्ये हमाल तरुणाचा गळा चिरून सोलापूर गाठले

9
murder-knife

सामना प्रतिनिधी, मुंबई

दादर येथील टिळक ब्रिजखाली एका हमाल तरुणाचा ब्लेडने गळा चिरून पसार झालेल्या आरोपीला माटुंगा पोलिसांनी अखेर शोधून काढले. 20 दिवस कसून शोध घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या सोलापुरात जाऊन मुसक्या आवळल्या.

29 जून रोजी माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टिळक ब्रिजखाली एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे कळताच माटुंगा पोलिसांनी त्याला शीव रुग्णालयात नेले होते, मात्र गळ्यावर ब्लेडने वार झाल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला पण मृत तरुणाची ओळख पटत नव्हती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, उपनिरीक्षक मारुती शेळके, प्रशांत कांबळे, रामदास कदम, एपीआय अबरंगे व पथकाने गुह्याचा तपास सुरू केला.

मृत तरुणाची ओळख पटत नव्हती, शिवाय आरोपीला कोणी पाहिले नव्हते. त्यामुळे आरोपीचा शोध घेताना पोलिसांना प्रचंड अडचणी येत होत्या. पोलिसांनी परिसरातील अनेकांकडे चौकशी केली. शिवाय दादर पूर्व व पश्चिमेकडील 60 ते 70 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मृत तरुणाची ओळख पटली. त्यानंतर तांत्रिक बाबीचा अभ्यास केला असता आरोपी सोलापूर येथे पळून गेल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने सोलापूर गाठून आरोपी वीरभद्रया हिरेमठ (28) याला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या