बहिणीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणाची गोळी झाडून हत्या

767

आपल्या सख्ख्या बहिणीची छेड काढणाऱ्याला विरोध करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना दिल्ली येथील गाझियाबाद येथे घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सलीम असं या तरुणाचं नाव असून तो गाझियाबाद येथील मौलाना आझाद कॉलनीत राहायचा. शनिवारी दुपारी काही अज्ञात आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले. मारलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी सलीमच्या डोक्यात लागली आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा सलीमच्या बहिणीने छेडछाड झाल्याची माहिती पोलिसांना दिली.

सलीमच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या परिसरात राहणाऱ्या शफिक नावाच्या माणसाच्या मुलाने तिची छेड काढली होती. याचा विरोध केल्याने तिला आणि तिच्या आईला मारहाण झाली होती. या प्रकरणाची तक्रार सलीमने केली होती. मात्र, पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्या रागास्तव सलीमची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या बहिणीने केला आहे. दरम्यान, आर्थिक देवघेवीवरूनही काही शेजाऱ्यांशी वाद सुरू होता. त्यामुळेही सलीमची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या