ओढय़ाच्या पुरात तरुण बेपत्ता; दोघे बचावले, कासेगाव येथील घटना

sunk_drawn

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे ओढय़ाला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेला आहे. 24 तास उलटले असून, तो अद्यापि बेपत्ता आहे. ज्ञानेश्वर संभाजी कदम असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. त्याचे दोन सहकारी बबन वानकर व महादेव रेड्डी थोडक्यात बचावले आहेत. सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे राहणारे ज्ञानेश्वर संभाजी कदम व त्याचे दोन मित्र बबन वानकर व महादेव रेड्डी हे तिघे उळेगावावरून कासेगावकडे रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून निघाले होते. उळेगाव ते कासेगावदरम्यान असलेल्या ओढय़ाच्या पुलावरून मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहत होते. ओढय़ाला पूरस्थिती होती. पाण्याचा अंदाज न घेता तिघांनी दुचाकीवरून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे तिघेही पाण्यात पडले.

दरम्यान, प्रसंगावधान राखत बबन वानकर व महादेव रेड्डी यांनी एका झाडाचा आसरा घेतला. मात्र, ज्ञानेश्वर कदम दुचाकीसह वाहून गेला. वानकर व रेड्डी हे दोघे बचावले, तर कदम अद्यापि बेपत्ता आहे. त्याची दुचाकी आज दुपारी सापडली. घटनास्थळी बचाव पथक, अग्निशमनसह पोलीस पथक दाखल झाले आहे. सायंकाळी अंधार पडू लागल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली आहे.