मागवलं माऊथवॉश, मिळाला मोबाईल! मुंबईकर तरुणाने दाखवला प्रामाणिकपणा

mouthwash

गेल्याच महिन्यात ऑनलाईन सफरचंद ऑर्डर करणाऱया एका व्यक्तीला चक्क आयफोन मिळाल्याची घटना अमेरिकेत घडली होती. अशीच काहीशी घटना आता मुंबईत घडली आहे. ऑनलाईन माऊथवॉश ऑर्डर करणाऱया एका व्यक्तीला चक्क मोबाईल फोन मिळाला आहे. मात्र या तरुणाने प्रामाणिकपणा दाखवत ट्विटरवर घडलेला प्रकार सांगितला आहे.

लोकेश डागा याने ऍमेझॉनवर माऊथवॉशची ऑर्डर दिली. काही दिवसांनी त्याच्या घरी एक पॅकेट आले. ते पॅकेट लोकेशने उघडून पाहिल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. माऊथवॉशच्या जागी त्याच्याकडे चक्क रेडमी नोट-10 हा स्मार्टफोन आला होता. त्याने ट्विटरवर आपला अनुभव शेअर केला आहे.

सोबत वेबसाईटवर दिलेल्या ऑर्डरचा आणि हाती आलेल्या मोबाईल फोनचा क्रिनशॉटदेखील ट्विट केला. माऊथवॉश कंज्युमेबल प्रॉडक्ट असल्याने रिटर्न करता येत नाही. त्यामुळे ऍपच्या माध्यमातून रिटर्न रिक्वेस्ट टाकण्यास मी असमर्थ आहे, असे लोकेशने म्हटले आहे.

इनव्हॉईसमुळे झाली शंका दूर

पॅकेजिंगवर लोकेशचे नाव असले तरी इनव्हॉईसमुळे लोकेशच्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. त्याच्या वस्तूची दुसऱया एका ग्राहकाच्या वस्तूशी अदलाबदल झाली होती. हा स्मार्टफोन हैदराबाद येथील एका महिलेच्या घरी पाठवयाचा होता. मात्र त्याऐवजी हा स्मार्टफोन लोकेशकडे आला होता आणि हैदराबादमधील त्या महिलेकडे माऊथवॉश पोहोचले होते.

आपली प्रतिक्रिया द्या