चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालय दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना मुंबई विद्यापीठाने भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी युवासेनेने केली होती, परंतु अजूनही याबाबत विद्यापीठाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे या पुढील व्यवस्थापन परिषद सभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी युवासेनेने विद्यापीठाकडे केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात घेतलेल्या संयुक्त बैठकीत मुंबई विद्यापीठ कुलगुरू निधीबाबत चर्चा करण्यात आली आणि चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालय दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती, परंतु अजूनही याबाबत विद्यापीठाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्याअनुषंगाने युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य, मुंबई विद्यापीठ प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे यांना निवेदन देऊन पुढे होणाऱ्या व्यवस्थापन परिषद सभेत ठराव मंजूर करण्यात यावा की, यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यास अपघात अथवा नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले तर कुलगुरू निधीमधून भरीव आर्थिक मदत करण्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली आहे.