
सामना प्रतिनिधी । नगर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल गलिच्छ शब्द उच्चारणाऱ्या छिंदमला तडीपार करावे अशी मागणी युवासेनेने केली. महाराष्ट्राच्या शिवभक्तांचे मने दु:खाणाऱ्या व अशांतता निर्माण करणाऱ्या श्रीपाद छिंदमला पोलिसांनीच मोठ्या फौजफाट्यासह महापालिकेत प्रवेश दिला. या निषेधार्थ विक्रम राठोड यांचा नेतृत्वाखाली युवासेनेने छिंदमला राज्याबाहेर तडीपार करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना देण्यात दिले.
छिंदमने महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य केल्यानंतर राज्यातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आंदोलने झाली. त्याला कायमचा तडीपार करण्याची मागणी झाली. परंतु गुरुवारी पोलिसांनी त्याला संरक्षण देऊन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी छिंदमला महापालिकेत प्रवेश करण्यासाठी सुरक्षा बंदोबस्त दिला. शिवद्रोही छिंदमला पाठीशी घालून पोलीसच नगरला बदनाम करत आहे का? असा सवालही निवेदनात केला आहे. या पुढील काळात काही दंगल किवा अशांतता निर्माण झाल्यास त्यास पोलीसच जबाबदार राहतील असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे.



























































