
नॅकचे मूल्यांकन नसल्याने प्रवेश प्रक्रियेतून वगळलेल्या 156 नॅकबाधित महाविद्यालयांना प्रतिज्ञापत्र जमा करण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. या महाविद्यालयांना 27 मेपर्यंत प्रतिज्ञापत्रे विद्यापीठात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र शनिवार-रविवारी स्टॅम्प पेपर विक्री बंद असल्याने आणि कोकणात सध्या सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे या अटीची पूर्तता करून अवघ्या दोन दिवसांत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे महाविद्यालयांना शक्य नाही. परिणामी कॉलेजांना मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, व्यवस्थापन परिषद सदस्य शीतल शेठ देवरुखकर, मिलिंद साटम, शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.
नॅक मूल्यांकन न केल्यामुळे प्रथम वर्षाचे प्रवेश करण्याकरिता 156 महाविद्यालयांना स्थगिती देण्यात आली होती. या महाविद्यालयांना कागदपत्रे जमा करण्यासाठीचा कालावधी वाढवून देण्यात यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सुकर होईल, अशी मागणी युवासेनेने केली आहे.