बोगस आयआयटी संस्थांवर तातडीने कारवाई करा; युवासेनेची मागणी

सामना ऑनलाईन । मुंबई

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडे नोंदणी नसलेल्या शेकडो आयआयटी संस्था राज्यात कार्यरत आहेत. अशा संस्थांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही असे स्पष्ट करत व्यवसाय संचालनालयाने त्या संस्थांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या संस्थांवर तातडीने कारवाई करा अशी मागणी युवासेनेने व्यवसाय शिक्षण संचालकांकडे केली आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विविध कौशल्य अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. त्यासाठी राज्यभरात शेकडो आयआयटी संस्था आहेत. राज्यात सुमारे 300 खासगी क्लासेस आणि शिक्षण संस्था संचालनालयाकडे नोंदणी न करता असे अभ्यासक्रम चालवत आहेत. सॉफ्टवेअर, ऍनिमेशन, आरोग्य, सौंदर्य आदी क्षेत्रातील व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने प्रमाणित केलेले प्रशिक्षण मिळावे, त्यांची परीक्षा सरकारमार्फत व्हावी आणि प्रमाणपत्रही सरकारने द्यावे या उद्देशाने अशा संस्थांना नोंदणी करण्याचे निर्देश संचालनालयाने दिले आहेत. या संस्थांनी येत्या 15 दिवसांत नोंदणी न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही असे संचालनालयाने बजावले आहे.

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून युवासेना सिनेट सदस्यांनी राज्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक अनिल जाधव यांची आज भेट घेतली. बोगस आयआयटी संस्थांवर कडक कारवाई तातडीने करावी असे निवेदन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, राजन कोळंबेकर, शीतल शेठ-देवरुखकर, निखिल जाधव, मिलिंद साटम, ऍड. वैभव थोरात आदी उपस्थित होते अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.