Nagar News – आष्टी-नगर-पुणे-मुंबई रेल्वे शटल सुरु करा; युवा सेनेची मागणी

आष्टी-नगर-पुणे-मुंबई रेल्वे शटल एक्स्प्रेस सुरु करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड यांनी केली आहे. खासदार निलेश लंके यांच्यामार्फत केंद्र सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शहराध्यक्ष संभाजी कदम ,पप्पू भाले, मुन्ना भिंगारदिवे आदि मंडळी उपस्थित होते.

मंत्रालयाने महतप्रयासाने आष्टी नगर रेल्वे सुरु केली. मात्र या रेल्वेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता या रेल्वेचा फ्लॉप शो झाला आहे. प्रत्यक्षात ही रेल्वे आष्टी-नगर-दौंड कॉडलाईन-पुणे आणि पुढे मुंबई अशी धावायला हवी होती. आपल्या नगर स्थित रेल्वे कर्मचाऱ्यांचे ड्युटीचे तास पूर्ण व्हावेत आणि त्यांना परत नगर मुक्कामी येता यावे या माफक उद्देशाने ही रेल्वे सकाळी नगरहून आष्टीला सोडली आणि ती दुपारी 2 पर्यंत परत नगरला आणली.

आता या शटलची दुसरी फेरी दुपारी परत नगरहून आष्टीकडे सोडण्यात येणार आहे आणि सायंकाळी आष्टीहून निघून ती नगरला आणण्यात येणार आहे. पण या रेल्वेला प्रवाशांचा अतिशय अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. तरीदेखील या फ्लॉप शोचा रिपीट टेलिकास्ट करण्याचा घाट रेल्वेने घातला आहे.

ही रेल्वे जर आष्टी नगर-दौंड-पुणे-मुंबई अशी सुरु झाली तर तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. बीड, आष्टी, जामखेड आणि नगरहून पुण्याला दिवसाला पाच लाखाहून अधिक लोक ये-जा करीत असतात. नगर पुणे रोडवरील सूप टोल नाक्यावर याची नोंद आहे . तसेच नगर-पुणे मार्गावर दररोज 2 हजाराहून अधिक एसटी आणि खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूक होते.

नगरमधील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहतात. त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. थेट रेल्वे सुरू झाल्यास दीड तासात ते पुण्याला पोहोचू शकतील. आपल्या घरी राहूनच शिक्षणासाठी ये-जा करू शकतील. रेल्वेअभावी प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. त्यामुळे लवकरात लवकर आष्टी नगर-दौंड क्वाडलाईन-पुणे-मुंबई रेल्वे चालू करावी अशी विनंती राठोड यांनी केली आहे.