
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सध्या त्याच्या काही मुलाखतींमुळे चर्चेत आहे. या मुलाखतींमध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील अनेक न ऐकलेले किस्से शेअर केले आहेत. असाच एक रंजक किस्सा त्याने आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्याबद्दल सांगितला आहे. हा प्रसंग 2007च्या टी-20 विश्वचषकादरम्यानचा आहे, जेव्हा युवराजने इंग्लंडविरुद्ध डर्बनमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. त्या ऐतिहासिक खेळीनंतर ललित मोदींनी युवराजला एक महागडी कार भेट दिली होती, ज्याची चर्चा आजही क्रिकेट वर्तुळात रंगते. आता युवराजने ‘द ओव्हरलॅप क्रिकेट’ या पॉडकास्टवर बोलताना त्या कारमागील किस्सा शेअऱ केला आहे.
युवराज सिंगने सांगितले की, सहा षटकार मारल्यानंतर ललित मोदींसोबत त्याची एक रंजक चर्चा झाली होती. मोदींनी सुरुवातीला सांगितले होते की, जर कोणी सहा षटकार मारले तर ते त्याला ‘फेरारी’ कार देतील. जेव्हा युवराजने ही कामगिरी करून दाखवली, तेव्हा त्याने मोदींना आपल्या फेरारीबद्दल विचारले. त्यावर मोदींनी त्याला ‘पोर्श ९११’ कार देण्याचे आश्वासन दिले. युवराजने पुन्हा एकदा मोदींना आपल्या पोर्शबद्दल विचारले असता, त्यांनी त्याला ती कार लवकरच मिळेल असे आश्वासन दिले. युवराजने मजेत त्यांना असेही विचारले की, जर मी पुढचा सामनाही जिंकवून दिला तर मला फेरारी मिळेल का? त्यावर मोदींनी हसत उत्तर दिले की तुला फक्त पोर्शच मिळेल. अखेर ललित मोदींनी आपला शब्द पाळला आणि युवराजला ‘बीएमडब्ल्यू एम 5’ ही आलिशान कार भेट म्हणून दिली. ललित मोदींनी दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल युवराजने त्यांचे कौतुकही केले आहे.
या मुलाखतीत युवराजने आणखी एक रंजक किस्सा सांगितला. ज्या स्टुअर्ट ब्रॉडला त्याने सहा षटकार ठोकले, त्याचे वडील ख्रिस ब्रॉड त्या सामन्यात पंच होते. सामन्यानंतर ख्रिस ब्रॉड युवराजकडे आले आणि म्हणाले की, तू माझ्या मुलाची कारकीर्द जवळपास संपवली होतीस. त्यांनी युवराजला स्टुअर्टसाठी एका शर्टवर सही करण्याची विनंती केली. युवराजने मोठ्या मनाने आपल्या टीम इंडियाच्या जर्सीवर एक संदेश लिहिला. त्यात त्याने नमूद केले होते की, माझ्यावरही पाच षटकार मारले गेले आहेत, त्यामुळे त्या वेळी काय वाटते याची मला जाणीव आहे. तू भविष्यात एक महान खेळाडू बनशील, अशी सदिच्छाही त्याने दिली होती. मात्र, युवराजने हसत हसत पुढे असेही सांगितले की, अलीकडेच त्याला समजले की जेव्हा ख्रिस ब्रॉड यांनी तो शर्ट स्टुअर्टला दिला, तेव्हा त्याने तो रागाच्या भरात कचरापेटीत फेकून दिला होता.



























































