
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
मागील दोन दिवस तालुक्यातील झर्ये धनगरवाडी परिसरात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे तेथील अपुर्णावस्थेत असलेल्या पाझर तलावाला धोका निर्माण झाला असून तलावाच्या पायथ्यापासुन मोठ्या प्रमाणावर गळती सुरु झाल्याने तो तलाव केव्हाही फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. तलावाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या दोन घरांच्या दारापर्यंत त्या प्रकल्पाचे पाणी पोहचले असुन तेथील रस्ताही वाहून गेला आहे. त्यामुळे तेथील कुटुंबियाना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाकडुन देण्यात आल्या आहेत. तलावाखालून वाहणाऱ्या नावेरी नदीकाठावरील चार गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राजापुर तालुक्यातील एका टोकाला डोंगराळ भागात झर्ये हा गाव असुन चालु वर्षे दिनांक तेरा डिसेंबर सतराला या पाझऱ तलावाचे काम सुरु झाले होते. त्यासाठी सुमारे एकावन्न लाखाच्या आसपास खर्च होणार असुन शंभर हेक्टर पर्यंतचे क्षेत्र बुडीत क्षेत्राखाली येणार आहे. या पाझऱ तलावाचे काम अर्धवट अवस्थेत असून गेले दोन दिवस या क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव तुडुंब भरला आहे. तलावावरुन जोरात पाणी वाहु लागले आहे. शिवाय त्याच्या पायथ्याला देखील मोठ्या प्रमाणावर तडे जावुन त्यामधुन पाणी वेगाने बाहेर पडत असल्याने हा तलाव केव्हाही फुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याखालील बुडीत क्षेत्रातील सुमारे पाचपैकी दोन घराना मोठा धोका निर्माण झाला आहे. तलावातून बाहेर पडलेले पाणी दोन्ही घरांच्या अंगणापर्यंत पोहचले होते. शिवाय त्या घरांकडे जाणारा रस्ता देखील वाहुन गेल्याने तेथील वास्तव्याला असलेल्या कुटुंबियांच्या अडचणी अधिकच वाढल्या होत्या. याबाबतची माहिती मिळताच राजापुरच्या तहसीलदार श्रीमती प्रतिभा वराळे यानी झर्ये गावी जावुन प्रत्यक्ष पहाणी केली होती. तलाव परिसरातील त्या दोन घरातील कुटुंबियाना सुरक्षीत स्थळी हलण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग होऊन धोका निर्माण होऊ शकतो. नदीकाठच्या कोंडगे, रिंगणे, कुरंग, कोंडगे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आमदार राजन साळवी यांना याबाबतची माहिती मिळताच त्यानी तात्काळ झर्ये गावात जाऊन त्या पाझर तलावाची पहाणी करुन प्रशासनाला परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हसविण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्यासमवेत राजापूरचे सभापती अभिजीत तेली, पाचलचे शिवसेना विभागप्रमुख गणेश तावडे, उपविभागप्रमुख नितेश सावंत, सरपंच जनार्दन विश्वासराव, शाखा प्रमुख बाळकृष्ण विश्वासराव, धनगर समाज तालुका अध्यक्ष प्रकाश झोरे, तुकाराम भोजे, मधुकर तावडे, अनिल कदम, विठोबा हेडगे, बाबू चौगुले, पद्माकर विश्वासराव, रामचंद्र चौगुले, संतोष हेडगे, अनंत काळे, बाबू चौगुले, सोनू चौगुले व अन्य गावकरी आदींचा सामावेश होता. तर संपुर्ण जिल्हा प्रशासन देखील परीस्थीतीवर लक्ष ठेवुन होते. तेथील बुडीत क्षेत्रात असलेल्या दोन घरांचे सुरक्षीत पुनर्वसन व्हावे, अशी आपण येत्या अधिवेशनात मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या तलावाचे भाजपने श्रेय लाटण्यासाठी घाई गडबडीत उद्घाटन केले होते.































































