
महापालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आयोगाकडून करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी म्हणजे निकाल लागणार आहे. यामुळे शहरांनंतर राज्यातील ग्रामीण भागांमध्ये निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी आज पत्रकार परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीं निवडणुकांची घोषणा केली. यात राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे. आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच 12 जिल्हा परिषदांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.
दरम्यान, आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे. या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
असा असेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम…
> अधिसूचना 16 जानेवारी
> उमेदवारी अर्ज स्वीकारणार 16 जानेवारी ते 21 जानेवारीदरम्यान
> अर्जांची छाननी 22 जानेवारीला
> उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत
> निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी
> 27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर जाहीर केली जाईल
> मतदान 5 फेब्रुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत
> मतमोजणी आणि निकाल – 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून






























































