
पनवेलच्या खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना तब्बल २० किलोचा जिताडा सापडला आहे. कोल्ही कोपर परिसरात वाणा प्रकारच्या मासेमारीदरम्यान हा मासा मच्छीमारांच्या हाती लागला. माशाची माहिती मिळताच खवय्यांनी त्याच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. हा जिताडा २४ हजारांना विकला गेला आहे.
कोल्ही कोपर गावातील संत्तेवान पाटील, चंद्रकांत म्हात्रे व पारगावचा अंकुश गायकवाड हे तिघेही वाणा प्रकारची पारंपरिक मासेमारी करतात. दरम्यान, पनवेल खाडीत मासेमारी करताना त्यांना २० किलोचा जिताडा सापडला. पापलेट किंवा हलव्यालाही मागे टाकेल अशी चव असलेला जिताडा मासा सापडल्याची माहिती मिळताच हा भलामोठा मासा पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली. यावेळी पारगावातील खवय्याने २४ हजार रुपये मोजून हा मासा खरेदी केला.