
हिंदुस्थानच्या क्रिकेट विश्वात मोठी क्रांती घडवणारा टप्पा अहमदाबादमध्ये आकार घेतोय. सचिन तेंडुलकरच्या पाठबळाने एसआरटी टेन अल्टवॉल सेंटर ऑफ एक्सलेन्स क्रिकेट अॅकॅडमी येत्या 10 एप्रिलपासून सुरू होत असून पाच वर्षांवरील खेळाडूंना जागतिक दर्जाची ट्रेनिंग देण्याचा दमदार संकल्प यातून साकारला जाणार आहे. त्यामुळे ज्याला देवाकडून क्रिकेट शिकायचेय, त्यांना अहमदाबादमध्ये क्रिकेटचे देवदर्शन लाभेल.
या अॅकॅडमीत 40,000 स्क्वेअर यार्डच्या भव्य पॅम्पसमध्ये प्रोफेशनल नेट्स, स्वतःचे मैदान, हाय-परफॉर्मन्स जिम आणि रनिंग ट्रकसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबईतील एसआरटी 10 ग्लोबल अॅकॅडमीच्या यशामुळे उभारलेले हे पेंद्र आता महानगरांबाहेरही दर्जेदार प्रशिक्षण पोहोचवण्याच्या मिशनचा भाग बनत आहे.
ही अॅकॅडमी केवळ तंत्र शिकवणार नाही, तर फिटनेस, शिस्त, मानसिक ताकद आणि सामन्याची समज विकसित करणार आहे. माजी आंतरराष्ट्रीय आणि फर्स्ट क्लास खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे.
ग्लोबल हेड कोच डॉ. अतुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील हा प्रकल्प खेळाडू घडवण्यापेक्षा क्रिकेट समजणारे योद्धे तयार करणे या ध्येयाने काम करणार आहे.अहमदाबादसह आसपासच्या भागातील प्रतिभावान खेळाडूंना आता मोठे व्यासपीठ मिळणार आहे.


























































