
नवी दिल्ली – हिंदुस्थानच्या अॅथलेटिक्सला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नवी ओळख मिळवून देणारा एशियन गेम्स सुवर्णपदक विजेता आणि राष्ट्रीय विक्रमवीर मध्यम अंतर धावपटू जिनसन जॉन्सनने बुधवारी आपल्या काऱकीर्दीला पूर्णविराम दिला. 34 वर्षीय केरळच्या या खेळाडूने 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर संन्यास जाहीर करत जीवनातील नवे पर्व सुरू करण्याची तयारी दर्शवली. 2018 हे त्याच्या कारकीर्दीतील सुवर्णवर्ष ठरले. जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत 1500 मीटरमध्ये सुवर्ण, तर 800 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकत त्याने राष्ट्रीय विक्रम मोडले. ‘दोन राष्ट्रीय विक्रम आणि हिंदुस्थानसाठी दिलेले योगदान हेच माझे सर्वात मोठे यश आहे,’ असे भावुक शब्दांत त्याने नमूद केले.
टी-20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडचा अनुभवी संघ
ऑकलंड – आगामी टी–20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाचा 15 सदस्यीय अनुभवी संघ जाहीर झाला आहे. वेगवान गोलंदाज जेकब डफीला संघात स्थान देण्यात आले असून तो पहिल्यांदाच सीनियर वर्ल्ड कप खेळणार आहे. ही स्पर्धा पुढील महिन्यात हिंदुस्थान आणि श्रीलंकेत होणार आहे. मिचेल सॅण्टनर संघाचे नेतृत्व करणार आहे. डफीने 2025 मध्ये 36 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 81 विकेट घेत उत्पृष्ट कामगिरी केली असून याच सातत्यामुळे त्याची वर्ल्ड कप संघात निवड झाली आहे. न्यूझीलंड संघः मिचेल सॅण्टनर (कर्णधार), फिन अॅलन, मायकेल ब्रेसवेल, मार्प चॅपमन, डेव्हन का@नवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सायफर्ट, ईश सोढी. राखीव खेळाडू ः कायल जेमिसन
ऑस्ट्रेलियन ओपनच्या बक्षिसात विक्रमी वाढ
मेलबर्न – वर्षातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या बक्षीस रकमेत यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 16 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. 18 जानेवारीपासून सुरू होणाऱया या स्पर्धेसाठी 2026 मध्ये एपूण बक्षीस रक्कम 111.5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे 75 दशलक्ष अमेरिकी डॉलर) इतकी निश्चित करण्यात आली असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक आहे. 2025 मधील 96.5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. महिला व पुरुष एकेरी गटातील विजेत्यांना प्रत्येकी 4.15 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर मिळणार असून ही रक्कम मागील वर्षापेक्षा 19 टक्के अधिक आहे. पात्रता फेरीसाठीच्या बक्षीस रकमेत 16 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तसेच मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करणाऱया सर्व एकेरी व दुहेरी खेळाडूंना किमान 10 टक्के वाढीव बक्षीस मिळणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
































































