खर्डी-दळखण रेल्वे फाटक बंद; विद्यार्थी, रहिवाशांना १० किमी फेरा; प्रशासनाची ‘तारीख पे तारीख’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खर्डी स्थानकाजवळ रेल्वे प्रशानाच्या माध्यमातून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी खर्डी व दळखण हा रेल्वे मार्ग गेल्या महिनाभरापासून बंद आहे. हा मार्ग सुरुवातीला ३ फेब्रुवारीला सुरू करण्यात येणार होता. मात्र त्यानंतर १० फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली, परंतु आता १३ फेब्रुवारीपर्यंत हा मार्ग बंद ठेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना १० किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे.

कल्याण-कसारा मध्य रेल्वे मार्गावर तिसऱ्या लाईनचे काम युद्धपातळीवर सुरू असून खर्डी स्थानकाचाही कायापालट होत आहे. खर्डी-दळखण हा मार्ग अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे १२ वी च्या परीक्षेला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच स्थानिकांना मुंबई-आग्रा महामार्गावरून रातांधळे, चांदा व बेलपाडा येथून १० किमीचा वळसा घालून जावे लागत आहे. हा मार्ग सुरू करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा तारीख देण्यात आली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा तारीख वाढवल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. तरी हे फाटक लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी दळखणचे उपसरपंच भगवान मोकाशी यांनी केली आहे.

खर्डी-दळखण रस्त्याचे काम सुरू असून येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत ते फाटक रहदारीसाठी सुरू होईल व येथील उड्डाण पुलाचे काम प्रस्तावित असून लवकरच मार्गी लागेल.
आर. एन. मैत्री, रेल्वे अधिकारी