
महाराष्ट्र वन विभागाने ‘ऑपरेशन तारा’ या राज्यातील दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील या तरुण वाघिणीचे यशस्वीरीत्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतर केले आहे. ताडोबामधील ‘चंदा’ या नावाने ओळखली जाणारी वाघीण शुक्रवारी पहाटे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली असून, ती आता ‘तारा’ या नावाने ओळखली जाईल.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्प येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथे स्थानांतर करण्यास मंजुरी दिली आहे. हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्था यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
“सह्याद्रीतील व्याघ्र पुनर्स्थापनासाठी हे स्थानांतर हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. ताडोबा व सह्याद्रीच्या पथकांचे समन्वित, वैज्ञानिक आणि व्यावसायिक कार्य अभिनंदनास पात्र आहे.
एम. एस. रेड्डी, प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक, महाराष्ट्र राज्य.
पुढील टप्प्यात वनात सोडण्यापूर्वी तिचे acclimatization व निरीक्षण करणार आहे. हे यशस्वी स्थालांतर महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या ऑपरेशन तारासाठी क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, विभागीय वन अधिकारी स्न्हेलता पाटील, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील, बाबासाहेब हाके, वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील, प्रदीप कोकितकर, किरण माने, संग्राम गोडसे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, आदींनी मोलाची भूमिका पार पाडली.
ऑपरेशन तारा हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे. या वाघिणीच्या सॉफ्ट रिलीजमुळे सह्याद्रीतील वैज्ञानिक पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आमच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जबाबदारीने व सुरळीतरीत्या पार पाडली. WII च्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यपूर्ण निरीक्षण करून सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनवू.
तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक
वाघिणीचा एक हजार किलोमीटर प्रवास
बुधवारी दुपारी ही वाघीण ५ वाजता पकडून पिंजऱ्यात बंदिस्त केली. कागदपत्र, वैद्यकीय तपासण्या, फिटनेस पाहून रात्री १० वाजता कराडच्या दिशेने प्रवास सुरु झाला. शुक्रवारी पहाटे १.३० वाजता सर्व टीम वाघीण घेऊन चांदोली येथे दाखल झाली. पुन्हा एकदा फिटनेस पाहून पहाटे ३.२० ला वाघीण एनक्लोजरमध्ये ‘सॉफ्ट रिलीज’ करण्यात आली. सुमारे १ हजार किलोमीटरचे अंतर २७ तास प्रवास करून वाघीण सुरक्षित खास पिंजऱ्यातून चांदोली येथे दाखल झाली.

























































